विद्यापीठाला नवीन परीक्षा नियंत्रकाची प्रतीक्षा
By admin | Published: May 20, 2014 03:34 AM2014-05-20T03:34:13+5:302014-05-20T03:34:13+5:30
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पद्मा देशमुख यांनी जानेवारी महिन्यात आपल्या पदाचा राजीमाना दिल्याने या पदासाठी विद्यापीठाने नवीन परीक्षा नियंत्रक म्हणून दिनेश भोंडे यांची नियुक्ती केली
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पद्मा देशमुख यांनी जानेवारी महिन्यात आपल्या पदाचा राजीमाना दिल्याने या पदासाठी विद्यापीठाने नवीन परीक्षा नियंत्रक म्हणून दिनेश भोंडे यांची नियुक्ती केली. मात्र, सुमारे दीड महिना उलटून गेला तरी भोंडे यांनी नवीन पदाचा कार्यभार स्वीकारलेला नाही. यामुळे विद्यापीठ गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रतीक्षेत आहे. परीक्षा नियंत्रक पद्मा देशमुख यांनी राजीनामा दिल्याने या पदाच्या नियुक्तीसाठी विद्यापीठाने जाहिरात दिली होती. त्यानुसार विद्यापीठाकडे २३ अर्ज आले होते. अर्जांच्या छाननीतून पाच जणांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली होती. परीक्षा नियंत्रक पदाच्या मुलाखतीनंतर दिनेश भोंडे यांची नियुक्ती केल्याचे विद्यापीठाने जाहीर केले. मात्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात परीक्षा नियंत्रक पदाची जबाबदारी पार पाडत असलेल्या भोंडे यांना मुक्त विद्यापीठाने अद्याप सेवेतून कार्यमुक्त केलेले नाही. नियुक्ती झाल्यानंतरही भोंडे सेवेत हजर होत नसल्याने विद्यापीठ प्रशासन सुमारे दीड महिन्यापासून त्यांची प्रतीक्षा करीत आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागात इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल रखडले आहेत. यामुळे विद्यापीठाविरोधात विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सध्या परीक्षा नियंत्रक म्हणून पद्मा देशमुख कार्यभार सांभाळत आहेत. मात्र, त्यांनी राजीनामा देऊन या कामाबाबत नाराजी व्यक्त केली होती. (प्रतिनिधी)