‘पीएफ’च्या प्रतीक्षेने कामगार संतप्त
By admin | Published: September 21, 2016 02:13 AM2016-09-21T02:13:07+5:302016-09-21T02:13:07+5:30
औद्योगिक परिसरात हजारो कामगार आपल्या भविष्याचे स्वप्न रंगवत दररोज ८ ते १२ तास घाम गाळतात.
भोसरी : औद्योगिक परिसरात हजारो कामगार आपल्या भविष्याचे स्वप्न रंगवत दररोज ८ ते १२ तास घाम गाळतात. पण कारखानदार व त्यानी नेमलेले एजंट यांची असंवेदनशीलता, गलथान कारभार यामुळे हजारो कामगारांना त्यांच्या हक्काचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) वेळेवर भविष्य निर्वाहनिधी कार्यालयाकडे भरला जात नाही आणि जरी निधी कार्यालयात भरला, तरी तो मिळविण्यासाठी कामगारांना हलेपाटे मारण्याची वेळ येते.
एमआयडीसीतील असंघटित कामगाराला निवृत्तिवेतन मिळत नाही. त्यामुळे उतारवयातील उदरनिर्वाहाची सोय म्हणून पीएफची रक्कम कामगारांना महत्त्वाची वाटते. निवृत्तीच्या वेळी मोठी रक्कम हाती येईल किंवा अडीअडचणीच्या वेळी ती कामी येईल, अशी कामगारांना अपेक्षा असते. किंबहुना नवीन कंपनीत रुजू होण्यापूर्वी सर्व प्रकारची चौकशी करून जुन्या कंपनीतील खाते स्थलांतरित करून सर्वसामान्य कर्मचारी भविष्य अधिकाधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतात.
मात्र, गेल्या काही वर्षांत भोसरीसह औद्योगिक परिसरात उघड झालेले घोटाळे आणि सरकारी आकडेवारी पाहता कंपन्यांकडून प्रॉव्हिडंट फंड भरण्यात दिरंगाई होत असल्याचे उघडकीस आले आहे.
अर्ज केल्यानंतर फक्त काही दिवसांत पैसे बँक खात्यावर जमा होतील, अशा वल्गना केल्या जातात. प्रत्यक्षात मात्र, पीएफ रक्कम मिळविण्यासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ कामगारांवर येते.
त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांमध्ये संतपाची भावना निर्माण झाली आहे. (वार्ताहर)