‘आरसी’ची प्रतीक्षा वाढतेय!

By admin | Published: December 19, 2014 12:48 AM2014-12-19T00:48:00+5:302014-12-19T00:48:00+5:30

राज्यभरातील ५० प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अजब कारभार सुरू आहे. अन्य सेवांसाठी आॅनलाईन आणि स्मार्ट पद्धतीचा अवलंब केला जात असताना वाहनांचे नोंदणीपुस्तक (आरसी बुक)

Waiting for 'RC'! | ‘आरसी’ची प्रतीक्षा वाढतेय!

‘आरसी’ची प्रतीक्षा वाढतेय!

Next

एक लाख वाहनधारक त्रस्त : करार संपूनही परिवहन विभागाचे दुर्लक्ष
सुमेध वाघमारे - नागपूर
राज्यभरातील ५० प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अजब कारभार सुरू आहे. अन्य सेवांसाठी आॅनलाईन आणि स्मार्ट पद्धतीचा अवलंब केला जात असताना वाहनांचे नोंदणीपुस्तक (आरसी बुक) पूर्वीप्रमाणेच कागदावर छापून दिले जात आहे. विशेष म्हणजे, आरसीबुक आॅप्टिकल स्मार्ट कार्ड स्वरूपात तयार करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या खासगी कंपनी ‘शाँग’शी करार संपला. सहा महिन्यांसाठी दिलेली मुदतवाढही संपली. परंतु या मुदतीत परिवहन विभाग हातावर हात ठेवून बसल्याने याचा फटका आता वाहनधारकांना बसत आहे. राज्यभरात एक लाख वाहनधारक आरसीच्या प्रतीक्षेत असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
परिवहन विभागाकडून २००६ मध्ये शाँग या कंपनीला आरसी बुक स्मार्ट कार्डच्या स्वरूपात तयार करून देण्याचे कंत्राट देण्यात आले होते. त्यापूर्वी नवीन नोंदणी झालेल्या वाहनांना आरटीओ कार्यालयातर्फे आरसी बुक कागदी पुस्तिकेच्या स्वरूपात दिले जात होते. मात्र ते सांभाळणे खूप जिकिरीचे होते. तंत्रज्ञानातील बदल ओळखून परिवहन विभागाने ‘शाँग’ या खासगी कंपनीला स्मार्टकार्ड बनविण्याचे कंत्राट दिले. जून २०१४ मध्ये हे कंत्राट संपले. या कंत्राटदाराला दिलेली सहा महिन्यांची मुदतवाढही नोव्हेंबरअखेरीस संपली आहे. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या तारखेपासून नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांना कागदी पुस्तिकेच्या स्वरूपातील आरसी बुक दिले जात आहे. उल्लेखनीय म्हणजे, देण्यात येणाऱ्या या कागदी आरसीबुकला पुन्हा स्मार्टकार्ड स्वरूपातील आरसी बुक बनवून घेण्यासाठी वाहनधारकांना आरटीओचे खेटे मारावे लागणार आहे. ‘शाँग’ कंपनीशी करार संपून व याला सहा महिन्यांची मुदतवाढ देऊनही या काळात परिवहन विभागाने काहीच हालचाली केल्या नसल्याने या विभागाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. ही परिस्थिती राज्यभरात आहे. परिणामी राज्यभरातील ५० प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन नोंदणीधारकांमध्ये संताप आहे. यातच दिवसाकाठी ५० वर नव्या वाहनांची नोंद होत असताना आज २० ते ३० आरसी बुक कागदी पुस्तिकेच्या स्वरूपात तयार होत असल्याने राज्यभरात एक लाख आरसी प्रलंबित आहेत. (प्रतिनिधी)
नागपूर आरटीओत चार हजार आरसी प्रलंबित
प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर शहर, ग्रामीण व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व मिळून मागील १५ दिवसांत सुमारे चार हजार आरसी प्रलंबित आहे. पूर्वी हे काम ‘शाँग’ कंपनीच्या १५ वर कर्मचाऱ्यांवर होते, ते आता आरटीओ कार्यालयाच्या दोन-तीन कर्मचाऱ्यांवर आले आहे. यामुळे जिथे १०० वर आरसी बुक स्मार्ट कार्डच्या स्वरूपात तयार व्हायचे तिथे दिवसाकाठी २० वर कागदी आरसी बुक तयार होत नसल्याने दिवसेंदिवस प्रलंबित आरसीची संख्या वाढत आहे.

Web Title: Waiting for 'RC'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.