...आता प्रतीक्षा कुलभूषण यांच्या सुटकेची!
By admin | Published: May 19, 2017 03:30 AM2017-05-19T03:30:42+5:302017-05-19T03:30:42+5:30
हेरगिरीच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. या निर्णयानंतर
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हेरगिरीच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. या निर्णयानंतर मुंबईकरांसह जाधव यांच्या मित्रपरिवाराने मिठाई वाटत आनंद साजरा केला. आता जाधव यांच्या सुटकेसाठी सरकारने प्रयत्न करावे, अशी मागणीही पुढे आली आहे.
जाधव यांचे बालपण गेलेल्या डिलाइल रोड येथील पोलीस वसाहतीसमोरच त्यांचा मोठा परिवार राहतो. जाधव यांची निर्दोष मुक्तता व्हावी, म्हणून येथील पृथ्वीवंदन सोसायटीमधील मित्र परिवाराने इतर रहिवाशांसोबत सकाळपासून पूजा-अर्चा सुरू केली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दुपारी जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली आणि रहिवाशांनी जल्लोष केला. जाधव यांचे मित्र तुळशीदास पवार म्हणाले की, ‘जाधव यांच्यासोबत लहानपणापासून एकत्र वाढल्याने घट्ट मैत्री आहे. त्यांचे वडील निवृत्त झाल्यानंतर ते पवईला स्थलांतरीत झाले. मात्र, जिव्हाळा तसूभरही कमी झाला नाही.
घराबाहेर फटाक्यांची आतशबाजी
कुलभूषण जाधव हे कुटुंबासोबत पवईच्या हिरानंदानी परिसरात राहतात. निर्णयानंतर स्थानिक रहिवासी आणि राजकीय नेत्यांकडून बंद घराबाहेर फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली. तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना पेढे वाटून लोकांनी आनंद साजरा केला.
आमच्यासाठी आज दिवाळी!
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे आज खूपच आनंद झाल्याची प्रतिक्रिया डिलाईल रोड येथील रहिवाशांनी व्यक्त केली. फटाके फोडून आणि एकमेकांना मिठाई वाटण्यात आली. संपूर्ण देशातून त्यांच्यासाठी प्रार्थना सुरू होती. त्यामुळे आजचा दिवस आमच्यासाठी दिवाळीहून कमी नाही.
डबेवाल्यांचेही साकडे
जाधव यांच्या अटकेनंतर मुंबईत ठिकठिकाणी मुंबईच्या डबेवाल्यांनी आंदोलने केली. जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर डबेवाल्यांनी निदर्शनेही केली होती. न्यायालयाने फाशीला स्थगिती दिल्यानंतर डबेवाल्यांनी आनंद व्यक्त करत, केंद्र सरकारने जाधव यांना लवकरात लवकर परत आणण्यासाठी साकडे घातले आहे.