संत तुकाराम गाथा अनुदानाच्या प्रतीक्षेत

By Admin | Published: March 7, 2015 12:24 AM2015-03-07T00:24:00+5:302015-03-07T12:04:28+5:30

गाथारूपाने ‘शब्दधन जनलोका’ देऊन मराठी वाङ्मय समृद्ध करणाऱ्या संत तुकाराम गाथेला शासकीय अनुदानाची प्रतीक्षा आहे.

Waiting for Saint Tukaram Satha grant | संत तुकाराम गाथा अनुदानाच्या प्रतीक्षेत

संत तुकाराम गाथा अनुदानाच्या प्रतीक्षेत

googlenewsNext

विश्वास मोरे, पिंपरी
गाथारूपाने ‘शब्दधन जनलोका’ देऊन मराठी वाङ्मय समृद्ध करणाऱ्या संत तुकाराम गाथेला शासकीय अनुदानाची प्रतीक्षा आहे. अनुदान बंद झाल्याने आता गाथेची किंमत दुपटीने वाढली आहे. चौदा वर्षांत एक लाख पस्तीस हजार विक्री करून अक्षरवाङ्मयात गाथेने विक्रम प्रस्थापित केला आहे.
‘आम्हा घरी धन, शब्दांची रत्ने...’ असे अक्षरांचे महत्त्व सांगून अभंगातून माणसांचे जीवन समृद्ध करणाऱ्या, भागवत धर्माच्या वारकरी संप्रदायाचा कळस, अर्थात संत तुकाराम महाराज यांच्या गाथेला दिवसेंदिवस अधिकच लोकप्रियता मिळत आहे. गाथेचा प्रवास पाहता, आजवर बाबासाहेब आजरेकर, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष स. के. नेऊरगावकर, बॅरिस्टर बा. ग. परांजपे, शंकर पंडित, लक्ष्मणराव पांगारकर, पुरुषोत्तम लाड, संत तुकाराम महाराज दिंडी सोहळा, वारकरी समाज संस्था यांनी तुकाराम गाथा संपादित केली होती. काहींनी धार्मिक अंगाने, तर काहींनी वैचारिक अंगाने सार्थ गाथा (पारायण प्रत) निर्माण केली आहे. साहित्य अकादमीसाठी डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी संक्षिप्त अभंगगाथा साकारली होती. त्याचबरोबर वारकरी संप्रदायातील अनेक संस्था, कीर्तनकारांनी गाथा प्रकाशित करून अक्षरधनात भर टाकली आहे.
विठ्ठलभक्तीबरोबरच जगण्याचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या, आत्मभान जागृत करण्याचे अलौकिक कार्य गाथेने केले आहे. महाराष्ट्रातील सामान्य जनता डोळ्यांसमोर ठेवून ‘तुकाराम गाथा’ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी श्रीक्षेत्र देहूतील संत तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्टने पुढाकार घेतला. तुकोबारांयाचे वंशज व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी तुकोबारायांच्या हस्तलिखितांचा, वह्यांचा आधार घेऊन संशोधन करून अधिकृत गाथा प्रकाशित केली. तसेच, पहिल्यांदा तुकाराम डॉट कॉमच्या माध्यमातून दिलीप धोंडे यांनी ही गाथा आॅनलाईन उपलब्ध करून दिली होती.
पहिल्या टप्प्यातील अनुदान संपल्यानंतर २००९मध्ये शासनाने- काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने पंधरा लाखांचे अनुदान दिले. त्यानंतर ७० हजार गाथांची निर्मिती केली.

गाथेची किंमत झाली दुप्पट
> सुंदर मुखपृष्ठ, उत्तम कागद, उत्कृष्ट बांधणी या गाथेचे वैशिष्ट्य असून, देवस्थानाने या गाथेस अधिकृत मान्यता दिली आहे. २००८पूर्वी या गाथेच्या एका प्रतीसाठी ८६ रुपये खर्च येत होता. त्या वेळी अनुदान असल्याने ही गाथा पन्नास रुपयांना विकली जात होती. मार्च २०१४पासून एका प्रतीसाठी ११० रुपये खर्च येत आहे. शिवाय, शासकीय अनुदानही संपले आहे. असे असताना केवळ ही गाथा शंभर रुपयांना विकली जात आहे. निर्मिती मूल्यापैकी दहा रुपयांचा भार देवस्थान उचलत आहे.

तरच किंमत कमी होऊ शकेल
> तुकाराम गाथा जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाचे अनुदान मिळणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना सरकारने गाथेला अनुदान द्यावे, अशी मागणी आम्ही केली आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनीही अनुदानाबाबत सकारात्मकता दर्शविलेली आहे. शासनाकडून अनुदान मिळाले, तर वारकऱ्यांना पुन्हा पन्नास रुपयांना गाथा देणे शक्य होईल, असे मत संत तुकाराम देवस्थानाचे अध्यक्ष रामदास मोरे यांनी व्यक्त केले.

Web Title: Waiting for Saint Tukaram Satha grant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.