दुकानदार स्वाइप मशिनसाठी वेटिंगवर
By admin | Published: January 3, 2017 06:23 AM2017-01-03T06:23:10+5:302017-01-03T06:23:10+5:30
नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस व्यवहारांवर भर दिला जात आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे खरेदी-विक्री करण्यास ग्राहक आणि दुकानदारांची पसंती मिळत आहेत
नम्रता फडणीस/प्रज्ञा केळकर-सिंग, पुणे
नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस व्यवहारांवर भर दिला जात आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे खरेदी-विक्री करण्यास ग्राहक आणि दुकानदारांची पसंती मिळत आहेत. यामुळे कार्ड स्वाईप मशीनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. खाजगी, राष्ट्रीयीकृत तसेच कोआॅपरेटिव्ह बँकांकडे अनेक व्यावसायिकांनी अर्ज केले असून अनेकांचे स्वाईप मशीन वेटिंगवर आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. जुन्या नोटांनी व्यवहार करणे शक्य नसल्याने सर्व व्यवसायांवर विपरित परिणाम झाला. रोखीने व्यवहार करणे शक्य नसल्याने ग्राहकांची संख्या लक्षणीयरित्या घटली. काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने कॅशलेस व्यवहारांचे आवाहन करण्यात आले. पानटपरीपासून हॉटेल व्यावसायिकांपर्यंत सर्वांनी कॅशलेस व्यवसायाची कास धरली. अनेकांनी स्वाईप मशीनसाठी बँकांकडे नव्याने अर्ज केले. मशीनची मागणी अचानक वाढल्याने अनेकांचे अर्ज प्रतीक्षेत असल्याचे बँकांकडून सांगण्यात आले. पूर्वी स्वाईप मशीनच्या वापरसाठी बँका व्यावसायिकांना माहिती देऊन उद्युक्त करत असत. आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. ग्राहक आपणहून बँकांकडे चौकशी करुन अर्ज करत आहेत. ग्राहकांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यास साधारणपणे १५-२० दिवसांमध्ये स्वाईप मशीन उपलब्ध होते. मात्र, मशीनची मागणी अचानक वाढल्याने हा कालावधी महिना-दीड महिन्यावर गेला आहे. मशीनची मागणी करणा-या ग्राहकांची संख्या दुुपटीने वाढली आहे.
राष्ट्रीयीकृत बँका सेंट्रलाईज्ड कंपन्यांकडून स्वाईप मशीन घेतात. या मशीनचे उत्पादन परदेशात होऊन ती या कंपन्यांकडे येतात. तेथून मागणीप्रमाणे बँकांकडे मशीन पाठवली जातात. कोआॅपरेटिव्ह बँका एजन्सीना मशीनची आॅर्डर देतात. या एजन्सीकडे साधारण परिस्थितीत महिन्याला १०-१५ मशीनची मागणी होत असे. आता, ही संख्या १०० च्या घरात गेली आहे. त्यामुळे उत्पादक कंपन्यांवरील कामाचा भारही वाढला आहे. त्यामुळेच सर्व पातळयांवर तुटवडा निर्माण झाला असून दुकानदारांचे स्वाईप मशीनचे अर्ज प्रतीक्षेत असल्याचे निष्पन्न झाले.
स्वाईप मशीनबाबतचे अर्ज, कामाचा भार वाढला असला तरी व्यावसायिकांचा कॅशलेस व्यवहारांकडे कल वाढणे, ही समाधानाची बाब असल्याचे बँकेच्या वरिष्ठ पदाधिका-यांनी सांगितले. अनेक बँकांनी व्यवहार सुलभ करण्यासाठी स्वत:ची अॅप्लिकेशन आणि कोड सिस्टिम विकसित केली आहे. या माध्यामातून ग्राहक आणि दुकानदारांना कमी वेळेत व्यवहार करणे सोपे झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले.