हजारो वीज सहायक प्रतीक्षेत
By admin | Published: November 17, 2015 03:00 AM2015-11-17T03:00:29+5:302015-11-17T03:00:29+5:30
सेवानिवृत्ती, पदोन्नती आदी कारणांमुळे विद्युत कंपनीतील कामगारांच्या हजारो जागा रिक्त झाल्या आहेत. यानंतरही वर्षभरापासून विद्युत सहाय्यकांना प्रतीक्षा यादीवरच ठेवण्यात आले आहे.
- विलास गावंडे, यवतमाळ
सेवानिवृत्ती, पदोन्नती आदी कारणांमुळे विद्युत कंपनीतील कामगारांच्या हजारो जागा रिक्त झाल्या आहेत. यानंतरही वर्षभरापासून विद्युत सहाय्यकांना प्रतीक्षा यादीवरच ठेवण्यात आले आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांकडे प्रत्येकी ५० ते ६० गावे असल्याने वीज विषयक प्रश्न गंभीर होत चालले आहे. तरीही नवीन कामगारांना घेण्यासाठी चालढकल सुरू आहे.
लाईनमनला सहाय्यक म्हणून विद्युत सहाय्यक या पदासाठी काही महिन्यांपूर्वी भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. यातील सुमारे सहा हजारावर लोकांना वेगवेगळ््या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली. तीन हजार ५०० उमेदवारांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले. या यादीची कालमर्यादा संपन्यापूर्वी नियुक्त्या मिळणे अपेक्षित आहे. मात्र अजूनतरी या यादीला हात लागला नसल्याचे सांगितले जाते.
मेंटनन्स, जोडण्या, वसुली आदी प्रकारची कामे लाईनमनकडे आहे. एका कामगाराकडे अनेक गावांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काही ठिकाणी तर ७० ते ८० ट्रान्सफार्मरची देखभाल दुरूस्ती त्यांना करावी लागत आहे. शिवाय बहुतांश कामगार वाढत्या वयामुळे विद्युत खांबावर चढूही शकत नाही. त्यामुळे नागरिकांचा प्रत्यक्ष संबंध येणारी कामे लांबणीवर पडत आहे. यावर उपाय म्हणून विद्युत कंपनीने काही महिन्यांपूर्वी विद्युत सहाय्यकांसाठी भरती प्रक्रिया घेतली. या प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीत असलेल्या उमेदवारांना नियुक्तीसाठी वाट पाहावी लागत आहे.