रक्ताच्या नात्यांत मुद्रांक शुल्क माफ
By admin | Published: April 10, 2015 04:52 AM2015-04-10T04:52:35+5:302015-04-10T08:41:02+5:30
रक्ताच्या नातेवाइकांना निवासी आणि कृषी मालमत्ता हस्तांतरित करताना यापुढे मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. यासंबंधीचे विधेयक गुरुवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले.
मुंबई : रक्ताच्या नातेवाइकांना निवासी आणि कृषी मालमत्ता हस्तांतरित करताना यापुढे मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. यासंबंधीचे विधेयक गुरुवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले.
नाममात्र शुल्कात रक्ताच्या नातेवाइकांच्या मालमत्तांचे हस्तांतरण सुलभ व्हावे, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून नोंदणी प्रक्रिया पारदर्शक करणे आणि महसूलवाढीबाबतचे सुधारणा सुचविणारे महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम सुधारणा विधेयक महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मांडले. एखादी निवासी वा कृषी मालमत्ता रक्ताचे नातेवाईक म्हणजे पती, पत्नी, मुलगा, मुलगी, नात, नातू व मृत मुलाची पत्नी अशा नात्यांमध्ये आपसात हस्तांतरित करताना यापुढे मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही.
तर केवळ २०० रुपये भरून हस्तांतरण करता येईल. मुद्रांक शुल्काच्या दराची आकारणी करताना यापुढे एकूण रकमेच्या टक्केवारीत आकारणी केली जाणार आहे. (विशेष प्रतिनिधी)