वाकीत रसायनयुक्त दारू
By Admin | Published: July 13, 2017 01:19 AM2017-07-13T01:19:13+5:302017-07-13T01:19:13+5:30
एकीकडे दारूबंदी झाली आणि दुसरीकडे हातभट्टी आणि गावठी दारूविक्रीला जोर वाढला
लोकमत न्यूज नेटवर्क
वाकी बुद्रुक : एकीकडे दारूबंदी झाली आणि दुसरीकडे हातभट्टी आणि गावठी दारूविक्रीला जोर वाढला. वाकी आणि परिसरात असणाऱ्या याच अवैध दारूविक्रेत्यांविरोधात अनेक वेळा गावातील लोकांनी आंदोलने केली. प्रत्यक्ष छापे टाकले. परंतु स्थानिक प्रशासन आणि गावकऱ्यांनी पाठिंबा न दिल्याने त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
मध्यंतरीच्या काळात दारूबंदी झाल्यानंतर लोकांनी ‘ती नाही मिळाली तर गावठी प्या, पण दारू प्या’ हे एक मराठी गाणं प्रत्यक्ष कृतीत उतरवलं. दारूसाठी व्याकूळ झालेले लोक या दारूविक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात तुंबडी भरत आहेत. हे अवैध दारूविक्रेते दिवसाला जवळजवळ हजारो लिटर दारू वाकी खुर्द आणि वाकी बुद्रुक या दोन गावांच्या डोंगराळ परिसरात तयार करत असतात. अगदी मोठ्या प्रमाणात ही दारू तयार करून ठिकठिकाणी विक्री करत आहेत. आजही अनेक ठिकाणी अशा प्रकारची दारू विक्री परिसरात सुरू आहे. जर प्रत्येक गावात दारूबंदीविरुद्ध मतदान झाले तर मोठ्या प्रमाणात उद्धवस्त झालेली कुटुंबे पुन्हा एकदा सुखी संसाराकडे वाटचाल करतील.
गावच्या डोंगरावर रात्रीच्या सुमारास ही दारू तयार करून ती मोठ्या हौदात साठवली जाते. त्यामुळे दररोज ही हजारो लिटर तयार होणारी दारू बऱ्याच कुटुंबांना त्यांच्या कर्त्या पुरुषाच्या रूपाने त्यांच्या अंगात उतरून छळत असते. त्यामुळे अशा अवैध धंद्यांना आळा घालणे, हे खूप गरजेचे आहे. त्यासाठी सर्व गावकी, भावकी तसेच गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन या विरोधात बंड पुकारून परिसरात सुरू असणारी ही दारूविक्री थांबवणे खूप गरजेचे आहे.