उठा उठाऽऽ दिवाळी आली, लक्ष्मीच्या सोनपावली!-

By admin | Published: October 25, 2016 11:31 PM2016-10-25T23:31:58+5:302016-10-26T00:14:16+5:30

- कारण राजकारण

Wake up Diwali, Laxmi's Sonpavali! | उठा उठाऽऽ दिवाळी आली, लक्ष्मीच्या सोनपावली!-

उठा उठाऽऽ दिवाळी आली, लक्ष्मीच्या सोनपावली!-

Next

‘उठा उठाऽऽ दिवाळी आली,
लक्ष्मी घरी यायची वेळ झाली’,
असा मेसेज आता मोबाईलवर फिरू लागलाय. तो बघून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती आणि महापालिका-नगरपालिकांच्या नगरसेवकांना उकळ्या फुटताहेत. कारण आता हे सगळे मतदार आहेत. सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था गटातून विधान परिषदेवर निवडून जाणाऱ्या आमदाराला यांची मतं लागतात. ही निवडणूक तोंडावर आलीय. पुढचे तीन आठवडे नुसता धुरळा. त्यात यंदा काँग्रेसनं राष्ट्रवादीपुढं शड्डू ठोकलाय. ही लढत काट्याची व्हावी... ती बिनविरोध बिलकूल होऊ नये यासाठी यातल्या काहींनी नवस बोललेत, काहींनी साकडं घातलंय, तर काहींनी देव पाण्यात ठेवलेत! कारण यांच्या निवडणुकीत मतदारांपुढं यांना वाकावं लागतं. आता हे उमेदवारांना वाकवतील!
ऐन दिवाळीत लक्ष्मीची पावलं यांच्या घरांकडं वळणार आहेत. मागची निवडणूक बिनविरोध झाल्यानं सगळ्यांचा हिरमोड झाला होता, पण यंदा भाव वधारणार, असं दिसतंय. (पूर्वी पाच लाखात आमदाराला फोडता यायचं, आता पाच लाखात नगरसेवकही फुटत नाही राव, असं परवा अजितदादा सोलापुरात म्हणाल्याचं ऐकिवात आहे!) राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून या जागेवर घड्याळवालाच बसत आलाय. काँग्रेससोबत आघाडी असली तरी काँग्रेसच्याच नानासाहेब महाडिकांनी बंडाचं निशाण फडकावून राष्ट्रवादीला दोनदा टक्कर दिली होती. (विधान परिषदेला पक्षापेक्षा उमेदवाराच्या ‘पॉवर’कडं बघून मतदान होतं, हे त्यांनी अधोरेखित केलं होतं.) याला अपवाद मागच्यावेळचा. त्यावेळी महाडिकांसारखा ‘मनी-मसल पॉवर’चा उमेदवार नसल्यानं निवडणुकीची रयाच गेली! आणि साताऱ्याचे प्रभाकर घार्गे बिनविरोध आमदार झाले.
सांगलीनं दोन टर्म आमदारकी भोगल्यानं सातारकरांना संधी मिळाली. यंदा जिल्ह्याच्या अस्मितेआधी पक्षीय अस्मिता जागी झाली. राष्ट्रवादीत ‘पॉवर’बाज उमेदवार दिसत नसल्यानं आणि स्वत:च्या ‘पॉवर’चा पुरेपूर अंदाज असल्यानं पतंगराव कदम यांनी काँग्रेसकडून आपले ज्येष्ठ बंधू मोहनशेठ दादांचं नाव पुढं केलं. याचा अंदाज येताच राष्ट्रवादीतून माण तालुक्यातल्या शेखर गोरेंना पसंती दिली गेली. त्यासाठी गोरेंनी रासपला सोडचिठ्ठी देऊन घड्याळ बांधलंय. मंगळवारी त्यांनी सांगलीत येऊन नारळही फोडला. माणचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांचे ते बंधू असले तरी आता दोघांतून विस्तव जात नाही. विधानसभेवेळी भावाच्या विरोधात शड्डू ठोकत त्यांनी ५३ हजार मतं घेतली होती. ‘मनी-मसल पॉवर’ दाखवण्यात तेही माहीर. धडाकेबाज नेते, अशी ख्याती. बडे कंत्राटदार! भुकेलेल्या मतदारांना आणखी काय हवं!!
मोहनशेठ काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते. कित्येक वर्षे जिल्हाध्यक्ष. राजकारणाचा दांडगा अनुभव गाठीशी. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि पक्ष संघटन यात हयात गेलेली. पण आमदार-खासदारकीचा गुलाल अजून लागलेला नाही. (एकदा तर खादारकीसाठी घातलेला मांडव ऐनवेळी काढावा लागला!) सहसा कुणाला दुखवायचं नाही, हे त्यांचं ब्रीद. राजकारणातली सगळ्या पक्षांतली पिढी त्यांच्याच अंगाखांद्यावर वाढलेली. त्यामुळं सगळ्याच पक्षात मैत्री आणि आदर (अपवाद फक्त खासदार संजयकाका आणि आमदार विलासराव जगतापांचा). आता ती मैत्री आणि आदरच जोखण्याची वेळ आलीय...
जाता-जाता : या जागेसाठी सांगलीचे २६६, तर साताऱ्याचे ३०४ मतदार आहेत. एकूण ५०७ मतदारांपैकी राष्ट्रवादीचं संख्याबळ (कागदावर तरी) काँग्रेसपेक्षा जास्त. मात्र मधल्या काळात राष्ट्रवादीतली बरीच मंडळी भाजप-शिवसेनेत गेलीत. भाजप-सेनेचं धोरण ठरलेलं नाही. उमेदवार निश्चित नाही. (ते ठरणारही नाही. कारण उगाच ‘हात दाखवून अवलक्षण’ कशाला!) असं असलं तरी त्यातील बहुतांश मंडळी जयंतरावांच्या इशाऱ्यावर चालतील. ही समीकरणं आताची. तशी वरवरचीच. निवडणुकीत व्यक्तिसापेक्षतेचे फुलबाजे फुटताना पुढच्या तीन आठवड्यात ती कशी बदलतील कोण जाणे! दारात आलेल्या लक्ष्मीला बिच्चारे मतदार कसे अव्हेरतील?

पतंगरावांची जुळवाजुळव
तशी पतंगरावांनी आधीपासूनच ‘फिल्डिंग’ लावली होती. रिंगणात उतरायचं तर ‘दम’ दाखवायचाच, हा त्यांचा शिरस्ता. साताऱ्यातल्या अनेकांशी त्यांचा दोस्ताना. तिथल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दोऱ्या ज्यांच्या हातात आहेत, त्या पृथ्वीराज चव्हाण, रामराजे नाईक-निंबाळकरांना कडेगावात आणून पतंगरावांनी पद्धतशीर पेरणी केली होती. साताऱ्याचे खासदार उदयनराजे तर भारती विद्यापीठाचे माजी विद्यार्थी. त्यात राष्ट्रवादीत असूनही राजेंचं पक्षाशी किती जमतं, हे सर्वश्रुत आहे! त्यामुळं त्यांच्याशी हातमिळवणी विनासायास होऊ शकते. (झालीही असावी!) कऱ्हाडातल्या कृष्णा कारखान्यावर पतंगरावांच्या घरातला संचालक ठरलेला असायचा. माणचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे तर पतंगरावांचे राजकीय मानसपुत्र! या ‘जयाभाव’ना पतंगरावांनी वेळोवेळी हात दिलाय. (आमदार व्हायच्या आधी ‘जयाभाव’ची जडणघडण सांगलीतच झालीय.) एवढी बेजमी असल्यावर मागे राहतील तर ते पतंगराव कसले!


लक्ष जयंतरावांकडं...
सांगलीच्या राष्ट्रवादीची धुरा जयंत पाटलांकडंच राहिलीय. आता त्यांच्या जोडीला साताऱ्यातून रामराजे आणि शशिकांत शिंदे आहेत. खरंतर जयंतराव आणि पतंगरावांचं ‘अंडरस्टँडिंग’ (याबाबत खासदार संजयकाका अधिक सांगू शकतात!) ठरलेलं असतं. पण अलीकडं जिल्हा बँक आणि बाजार समितीत त्यांचंं फिसकटल्याचं दिसलं. त्यातून वसंतदादा गट पतंगरावांसोबत आलाय. मात्र यापुढं जयंतरावांशी त्यांची ‘सेटलमेंट’ होणारच नाही, असं कुणीच सांगू शकत नाही. (कदाचित त्यामुळंच सांगलीतल्या उमेदवारापेक्षा साताऱ्यातल्या शेखर गोरे यांना उतरवण्याचं राष्ट्रवादीनं फायनल केलं असावं.) पतंगरावांचं बारामतीच्या साहेबांशी आणि अजितदादांशीही जमतं. अर्थात पक्षाचं धोरण (आतलं आणि बाहेरचं) काय ठरतं, यावर पुढची सगळी गणितं अवलंबून आहेत.

श्रीनिवास नागे

Web Title: Wake up Diwali, Laxmi's Sonpavali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.