वखार महामंडळ घोटाळ्याचा अकोल्यात बळी
By Admin | Published: February 5, 2016 02:29 AM2016-02-05T02:29:48+5:302016-02-05T02:29:48+5:30
अकोल्यात कंत्राटदाराची गळफास घेऊन आत्महत्या.
यदु जोशी/ नितीन गव्हाळे/ मुंबई/ अकोला : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात कंत्राटदारांचे रॅकेट सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारत असून नवीन कंत्राटदारांच्या निविदा मंजूर होणारच नाहीत, अशा पद्धतीने संगनमत केले जात असल्याचे लोकमतने दिलेले वृत्त ताजे असतानाच या रॅकेटचा फटका बसलेल्या अकोला येथील एका कंत्राटदारांने दोन दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली.
संतोष सावजी (४२) असे या कंत्राटदाराचे नाव असून 'मी टेंडर भरायला नको होते. ते भरण्याची मी चूक केली. मोठमोठय़ा लोकांमध्ये मी मोठय़ा रकमेचे टेंडर भरले. माझ्या कुटुंबाला वाचविण्यासाठी मी आत्महत्या करीत आहे,' असे सावजी यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
सावजी हे वखार महामंडळाच्या अन्नधान्य वाहतुकीच्या निविदा नियमितपणे भरत असत. गेली १0-१२ वष्रे ते या व्यवसायात होते. मात्र अलिकडे सावजी हे काही बड्या कंत्राटदारांच्या जाचाला त्रासले होते. त्यांनी जादा दराच्या निविदा भराव्यात किंवा निविदाच भरू नयेत, यासाठी त्यांच्यावर सातत्याने दबाव येत होता, अशी माहिती आहे.
वखार महामंडळातील कंत्राटदार, पुणे येथील मुख्यालयाचे अधिकारी आणि वेगवेगळ्या जिलंतील काही अधिकारी यांच्या संगनमताने विशिष्ट कंत्राटदारांचेच चांगभले होत असल्याची उघड चर्चा आहे. तसेच गेल्या ६-७ वर्षांत अव्वाच्या सव्वा दराने अन्नधान्य पुरवठय़ाची कंत्राटे देण्यात आली. यात गब्बर झालेले कंत्राटदार लहान कंत्राटदारांची मुस्कटदाबी करतात. या सगळ्या प्रकाराच्या तक्रारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुणे, धुळे, जालना, लातूर, जळगाव आदी ठिकाणांहून करण्यात आल्या आहेत.
संतोष सावजी यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला असता, त्यांच्या बंधुंनी सांगितले की, संतोष यांनी स्युसाईड नोटमध्ये लिहिलेल्या मजकुराची आणि त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. माझे बंधु संतोष हे काही दिवसांपासून दबावाखाली होते. त्यांना कोणत्या कंत्राटदारांचा त्रास होता, त्यांच्या कुटुंबाला संपविण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या का, याचीही चौकशी होण्याची गरज आहे.
वखार महामंडळात कोट्यवधी रुपयांचा वाहतूक दर घोटाळा झाल्याचे वृत्त लोकमतने २0 आणि २१ जानेवारीच्या अंकात दिले होते.