जागतिक महिला दिनानिमित्त वालिया कॉलेजच्या विद्यार्थिनींनी घेतली 'पॅडवुमन' डॉ. भारती लव्हेकर यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2018 05:17 PM2018-03-07T17:17:04+5:302018-03-07T17:17:04+5:30
अंधेरी पश्चिम वर्सोवा पोलिस ठाण्यालगत असलेल्या वालिया कॉलेजच्या ' बॅचलर ऑफ मास मीडिया ' च्या विद्यार्थिनींच्या शिष्टमंडळाने जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 'पॅडवुमन'...
मुंबई : अंधेरी पश्चिम वर्सोवा पोलिस ठाण्यालगत असलेल्या वालिया कॉलेजच्या ' बॅचलर ऑफ मास मीडिया ' च्या विद्यार्थिनींच्या शिष्टमंडळाने जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 'पॅडवुमन' आमदार डॉ. भारती लव्हेकर यांची वर्सोवा येथे त्यांच्या कार्यालयात नुकतीच भेट घेतली. ८ मार्च हा जागतिक महिला दिन आणि पॉलिटिकल सायन्स या विषयासाठी मुलाखत या दोन्ही गोष्टी साधून डॉ. भारती लव्हेकर यांच्याशी त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या असीमित कार्याने भारावलेल्या या विद्यार्थिनींनी त्यांच्यासोबत घडलेल्या अनौपचारिक संवादाचा व्हिडीओही बनवला आणि त्यांच्यासोबत सेल्फीही काढली.
'वालिया कॉलेज' च्या प्रथम वर्ष बीएमएम च्या विद्यार्थिनींनी ' जागतिक महिला दिन ' आणि पॉलिटिकल सायन्स या विषयासाठी एक शैक्षणिक प्रकल्प असा दुहेरी योग साधून 'पॅडवुमन ' आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या कार्याची माहिती जाणून घेतली. देशातील पहिली डिजिटल सॅनिटरी पॅड बँकची स्थापना करणा-या डॉ. भारती लव्हेकर यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या या विद्यार्थिनींच्या मनात त्यांना भेटून त्यांच्याशी हितगुज साधायची फार उत्सुकता होती. त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावर या विद्यार्थिनींच्या आनंदाला पारावारच उरला नाही. आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या विषयी तसेच त्यांनी सुरु केलेल्या देशातल्या पहिल्या डिजिटल ' ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँक ', ती कशी चालते या विषयी असलेली जिज्ञासा अनेक प्रश्नांद्वारे विद्यार्थिनी विचारत होत्या. एक-एक प्रश्नांना उत्तर देत आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी विद्यार्थिनींच्या सर्व शंकांचे निरसन केले. 'ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँके’ च्या अनोख्या पॅड बँकेविषयीची कल्पना उलगडून सांगताना आमदार डॉ. भारती लव्हेकर म्हणाल्या, " सर्वसामान्य महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या आणि आजाराबद्दल उगडपणाने बोलले जात नव्हते. आज आमची पॅड बँक ज्यांना सॅनिटरी नॅपकिन्स विकत घेणे परवडत नाही अशा समाजातील गरीब महिलांना दरमहा नियमितस्वरूपात १० सॅनिटरी पॅड मोफत उपलब्ध करून देते. मासिक पाळीविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही विविध ठिकाणी जनजागृतीही करतो. सॅनिटरी नॅपकिन ही चैनीची गोष्ट नसून मासिक पाळीदरम्यान प्रत्येक स्त्रीला त्याचा वापर करायला हवा हाच संदेश मी जागतिक महिला दिनानिमित्त देते."
आमदार डॉ. भारती लव्हेकर या 'ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँके ' च्या संस्थापक अध्यक्ष असून महिलांच्या त्या ५ दिवसांच्या वेदना अधिक सुसह्य करून त्यांना सॅनिटरी पॅड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहेत. 'ती सॅनिटरी पॅड बँके' च्या माध्यमातून सॅनिटरी पॅड्सचे मोफत वाटप, मोफत सॅनिटरी पॅड एटीएम व्हेंडिंग मशीन, डिस्पोझल मशिन्स, मॅनस्ट्रुअल हेल्थ किटची सुविधा उपलब्ध करून दिली जाते तसेच महिलांना स्त्रीरोगतज्ज्ञांचा मोफत सल्लाही उपलब्ध करून दिला जातो. 'ती सॅनिटरी पॅड बँके' तर्फे दरमहा गरीब विद्यार्थिनी आणि स्त्रियांना १० सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप केले जाते. मेन्स्ट्रुअल हेल्थ किटमध्ये विविध सूचना, मानसिक आधार देण्यासाठीची माहिती, २ निकर्स, पेनकिलर्स आणि सॅनिटरी पॅड्स या गोष्टी देण्यात येतात.