‘वॉक इन इंटरव्ह्यू’ होणार
By admin | Published: February 28, 2016 02:15 AM2016-02-28T02:15:16+5:302016-02-28T02:15:16+5:30
सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांच्या तुटवड्यावर उपाय म्हणून राज्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची गट अ ची तब्बल ११०० पदे भरण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता
- यदु जोशी, मुंबई
सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांच्या तुटवड्यावर उपाय म्हणून राज्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची गट अ ची तब्बल ११०० पदे भरण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. विदर्भ व मरावाड्यातील १४ जिल्ह्यांत डॉक्टरांची जवळपास ५०० पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत न भरता, ती ‘वॉक इन इंटरव्ह्यू’ने भरण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे.
आत्महत्याग्रस्त भागांतील सरकारी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची तातडीने आवश्यकता आहे. अशा वेळी एमपीएससीद्वारे भरती करण्यास विलंब होईल, हे लक्षात घेऊन, ‘वॉक इन इंटरव्ह्यू’द्वारे भरतीची परवानगी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागितली होती. ती देण्यात आल्यानंतर हा आदेश काढण्यात आला आहे. डॉ. सावंत यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आत्महत्याग्रस्त भागानंतर राज्याच्या इतर भागांतील रिक्त पदे भरण्यात येतील आणि तिथेही ‘वॉक इन इंटरव्ह्यू’द्वारेच भरती केली जाईल.
संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती भरती करेल. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी
आणि आदिवासी विकास विभागाचे सहायक आयुक्त हे समितीचे सदस्य असतील.
मराठवाड्यातील ८, अमरावती विभागातील सर्व ५, तसेच नागपूर विभागातील वर्धा असे १४ जिल्हे आत्महत्याग्रस्त आहेत. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची थेट भरती करताना आरक्षणानुसारच करण्यात येणार आहे. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकही वैद्यकीय अधिकारी नाही, तिथे भरती करण्यास प्राधान्य दिले जाईल. एकूण रिक्त पदांच्या ७५ टक्के पदे भरण्यात येणार आहेत. नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयातच राहणे अत्यावश्यक असेल.
वर्ग क, ड ची ३ हजार पदे भरणार
सार्वजनिक आरोग्य विभागात वर्ग क (तृतीय श्रेणी) आणि वर्ग ड ची (चतुर्थश्रेणी) ३ हजार रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले असून, लेखी परीक्षा लवकरच घेतली जाईल, असे आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
दुसऱ्या टप्प्यात ३ हजार आणि तिसऱ्या टप्प्यात आणखी ३ हजार अशी एकूण किमान ९ हजार पदे नजीकच्या काळात भरण्यात येतील.
एमडीमुळे ‘रिक्त’ पदे भरण्याचा प्रस्ताव
एमबीबीएस झालेले आरोग्य अधिकारी एमडी करण्यासाठी गेल्यानंतर, तो जिल्हा वा अन्य इस्पितळात सेवा देतो, पण त्याचे वेतन आधीच्या ठिकाणीच निघते. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते पद भरलेलेच असते आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रात डॉक्टर कागदावरच राहतात. या पार्श्वभूमीवर, एमडीसाठी गेलेल्या आरोग्य अधिकाऱ्याची पदे हंगामी स्वरूपात भरण्याचा प्रस्ताव आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठविला आहे.