पालखी मार्गाने दाखवली जगण्याची वाट
By admin | Published: June 29, 2016 09:18 PM2016-06-29T21:18:47+5:302016-06-29T21:18:47+5:30
लहान मुलांची छोटी बाबागाडी, त्यावर फुगे, विविध प्रकारची खेळणी अशा अनेक वस्तू विक्रीस मांडून पालखी सोहळ्याबरोबर मजल दरमजल करणारे सुमारे अडीचशे छोटे व्यावसायिक पालखी मार्गावर भेटले
ऑनलाइ लोकमत
पिंपरी, दि. २९ : लहान मुलांची छोटी बाबागाडी, त्यावर फुगे, विविध प्रकारची खेळणी अशा अनेक वस्तू विक्रीस मांडून पालखी सोहळ्याबरोबर मजल दरमजल करणारे सुमारे अडीचशे छोटे व्यावसायिक पालखी मार्गावर भेटले. हे छोटे व्यावसायिक अडथळा ठरत नाहीत, तर एक प्रकारे पालखी सोहळ्याची शोभा वाढवितात. श्रीक्षेत्र देहू, आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंतच्या मार्गावर त्यांना उदरनिर्वाहाचे साधन मिळते. खेळणी विक्रीतून अवघ्या वीस दिवसांत ते हजारो रुपयांची कमाई करतात. त्यांची लाखो रुपयांची उलाढाल होते. अनेक वर्षांपासून अशा प्रकारे व्यवसाय करणाऱ्यांनी पालखी मार्गाने जगण्याची वाट दाखवली, अशा भावना व्यक्त केल्या.
श्रीक्षेत्र देहू येथून संत तुकाराममहाराज यांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. आकुर्डीतील पहिल्या मुक्कामानंतर सकाळीच पालखी पुण्याच्या दिशेने निघाली. या पालखी सोहळ्याबरोबर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या बाजूने छोट्या व्यावसायिकांची बाबा गाड्यांची रांग लागल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. बाबागाडीवर लहान मुलांना आकर्षित करणारी विविध प्रकारची खेळणी, फुगे, पिपाण्या अडकवलेल्या. त्याबरोबर बाबागाडीला मध्ये बांधलेल्या कापडी झोक्यात बाळ झोपलेले. दुसऱ्या बाजूला स्वयंपाकासाठी लागणारा स्टोव्ह अडकवलेला. एकीकडे अडवलेल्या पिशवीत कपडे असे सर्व काही घेऊन विंचवाच्या पाठीवर बिऱ्हाड या उक्तीप्रमाणे छोट्या व्यावसायिकांचा लवाजमा दृष्टिपथास येत होता.
पालखी सोहळ्याचे तसेच त्यातील वारकऱ्यांच्या दिंड्या यांचे व्यवस्थापन कौतुकास्पद वाटते. पालखी सोहळ्याबरोबर चालणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचे व्यवस्थापनसुद्धा दखल घेण्यासारखे आहे. संत तुकाराम पालखी सोहळ्यात वारीच्या रांगेच्या बाजूने मार्गक्रमण करणारे हे छोटे व्यावसायिक ज्या ठिकाणी थांबतील, त्या ठिकाणी जत्राच भरते. काही विक्रेते लोणी काळभोरपर्यंत, तर काही पुढे सासवडपर्यंत जातात. काही जण बाबागाडी घेऊन थेट पंढरपूरपर्यंत जातात. कोणी मुंबईहून, कल्याण येथून, तर कोणी मराठवाड्यातून आले आहे.बहुतांश परप्रांतीय हिंदी भाषिक आहेत. २०हून अधिक वर्षे झाली, दर वर्षी न चुकता पालखी सोहळ्यात खेळणी विक्रीसाठी येत असतो, असेही अनेकांनी सांगितले.
गंगा सूरज पवार ही महिला म्हणाली, पालखी सोहळ्यात २० ते २५ हजारांची कमाई होते. पालखी सोहळ्यानंतर राहत असलेल्या परिसरात फिरून कपडे, बेडसीट विक्रीचा व्यवसाय करतो. रश्मी तसेच आर्या या महिलांनीसुद्धा खेळणी विक्रीतून पालखी मार्गावर समाधानकारक कमाई होते,असे नमूद केले. मराठवाड्यातून आलेल्या एकाने पालखी मार्ग जगण्याची वाट दाखविणारा मार्ग ठरला असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
.....................................
खेळणी विक्रेत्यांची लाखोंची उलाढाल
पालखी सोहळ्याबरोबर चालणारे खेळणी विक्रेते आषाढी वारीच्या काळात हजारो रुपयांची कमाई करतात. या विक्रेत्यांना खेळणी आणि कच्चा माल पुरवठा करणारी मोठी यंत्रणा आहे. उल्हासनगरमधून त्यांना पालखी मार्गावर वेळोवेळी आवश्यकतेनुसार माल उपलब्ध करून दिला जातो. छोट्याशा बाबागाडीवर खेळणी व अन्य विक्री साहित्य ठेवण्यास पुरेशी जागा नसते. मोठ्या प्रमाणावर माल घेऊन बाबागाडी ढकलणे अवघड जाते. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना माल पुरविणारी वाहने पालखी मार्गावरच फिरत असतात. विशिष्ट ठिकाणी त्यांना माल उपलब्ध करून दिला जातो. खेळणी विक्रेत्यांना २० ते २५ हजारांची कमाई होते, तर त्यांना माल पुरविणारे लाखो रुपये इकमावतात. अशा प्रकारे छोट्या व्यावसायिकांचे पालखी मार्गावरील व्यावसायिक अर्थकारण चालते.