घराची भिंत अंगावर पडून वृद्धाचा मृत्यू
By Admin | Published: June 6, 2017 01:36 AM2017-06-06T01:36:26+5:302017-06-06T01:36:26+5:30
भिंत अंगावर पडून ८५ वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना भाटनिमगाव गावच्या हद्दीत चव्हाणवस्ती येथे रविवारी (दि. ४) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : वादळी पावसाने घराची भिंत अंगावर पडून ८५ वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना भाटनिमगाव गावच्या हद्दीत चव्हाणवस्ती येथे रविवारी (दि. ४) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
बाबा निवृत्ती कांबळे (वय ८५, रा. चव्हाणवस्ती, भाटनिमगाव) असे मरण पावलेल्या वृद्धाचे नाव आहे.
यासंदर्भात त्याचा नातू गणेश अशोक कांबळे (रा. चव्हाणवस्ती) याने इंदापूर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. ठाणे अंमलदार अजीज शेख यांनी सांगितले, की रविवारी भाटनिमगाव परिसरात वादळी
वाऱ्यासह पाऊस झाला. त्या पावसात घरावरील पत्रा उडून गेला. बाबा कांबळे यांच्या अंगावर भिंत कोसळली. त्यांना उपचारासाठी इंदापूरला आणण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशा आशयाच्या खबरीवरून अकस्मात मृत दप्तरी या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, तहसीलदार श्रीकांत पाटील व
महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.
वीज पडून गायीचा मृत्यू
बारामती शहरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. आज शहरात रिमझिम स्वरुपाचा पाऊस झाला. जिरायती भागात मोरगाव परिसरात पहिल्याच दमदार पावसाने हजेरी लावली. सुपे परिसरात अद्यापपर्यंत पावसाने पाठ फिरविलेली आहे. जळगाव कप परिसरात वीज पडून गायीचा मृत्यू झाला.
बारामती तालुक्यातील जळगाव कप येथे वीज पडून सुखदेव वामन खोमणे या शेतकऱ्याच्या गायीचा मृत्यू झाला. आज जिरायती भागात प्रथमच मोरगाव परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली. मात्र, सुपे
परिसर अद्याप पावसाच्या
प्रतीक्षेत आहे.
बारामती शहरात सोमवारी दुपारपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ४.३० वाजता पाऊस सुरू झाला. सुमारे अर्धा तास पावसाचा जोर कायम होता. त्यानंतर मात्र, शहरात रिमझिम पाऊस सुरू होता. या पावसात अनेक नागरिकांनी चिंब भिजण्याचा
आनंद लुटला.
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर, सणसर येथे जोरदार पाऊस झाला. या पावसाने ओढे-नाले वाहिले. शेतांमध्ये पाणी साठल्याने शेततळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.