मनोरुग्णालयाला साडेपाच कोटींची तटबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2016 03:49 AM2016-11-03T03:49:44+5:302016-11-03T03:49:44+5:30
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयास साडेपाच कोटींची तटबंदी उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
प्रज्ञा म्हात्रे,
ठाणे- रुग्णांसह डॉक्टर आणि साधनसामग्रीच्या संरक्षणासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयास साडेपाच कोटींची तटबंदी उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षितेत भर पडून असामाजिक घटकांचा प्रवेश रोखला जाणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या सीमाभिंतीचा प्रश्न खितपत पडला होता. मात्र, शासनाने आता ती बांधण्याचा निर्णय घेतल्याने हा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयाची जवळपास ६० एकरहून अधिक जागा असून या जागेत अतिक्रमण वाढू लागले आहे. तसेच, आसपास राहणारे नागरिक याठिकाणी कचराही टाकत आहेत. या मनोरुग्णालयाला सिमाभिंतच नसल्याने यापूर्वी रुग्ण पळून जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत. यासर्व समस्या लक्षात घेता या ठिकाणी लवकरच ही सिमाभिंत उभारली जाणार आहे. त्यामुळे रुग्णालय आणि रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षतेत येणाऱ्या बाधेला आळादेखील बसणार आहे. यात सर्व्हंट कॉर्टर जवळ, ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ असलेला नाल्याचा भाग, एसीसी कंपनीच्या उत्तर दिशेची बाजू, एसीसी कंपनी ते ३२ नर्स कॉर्टरच्या उत्तर दिशेची बाजू, रेल्वे लाईन व बंजारा वस्ती जवळ अशा आठ ठिकाणी ही सिमाभिंत बांधली जाणार आहे.
भिंतीसाठी पाच कोटी ४५ लाख पाच हजार ८०५ रुपये मंजूर झाले आहेत.
याआधी चार कोटी ९७ लाख चोवीस हजार ९०६ रुपयांची तरतूद केली होती.
त्यात सुधारणा करुन ती आता पाच कोटींची केली आहे. यामुळे रुग्णालय प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.