वाळूमाफियांचा श्रीवर्धनमध्ये हल्ला
By admin | Published: May 23, 2015 01:20 AM2015-05-23T01:20:58+5:302015-05-23T01:20:58+5:30
बेकायदा वाळू उत्खनन सुरू असताना वाळूमाफियांना रंगेहाथ पकडणाऱ्या पोलीस व महसूल अधिकाऱ्यांवरच त्यांनी हल्ला केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला आहे.
अलिबाग (जिल्हा - रायगड) : श्रीवर्धन तालुक्यातील कारीवणे खाडीत बेकायदा वाळू उत्खनन सुरू असताना वाळूमाफियांना रंगेहाथ पकडणाऱ्या पोलीस व महसूल अधिकाऱ्यांवरच त्यांनी हल्ला केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला आहे. कारीवणे खाडीत ही धरपकड सुरू असताना जमावाने धक्काबुक्की करून पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण करीत त्यांनी ताब्यात घेतलेल्या सात जणांना सोडण्यास भाग पाडले.
श्रीवर्धन पोलीस व तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून टाकण्यात आलेल्या या संयुक्त छाप्याच्या कारवाईदरम्यान वाळू उद्योगाचा प्रमुख मोबिन हसीन परकार याने जमाव जमवून कारवाईस गेलेल्या साहाय्यक पोलीस निरीक्षक रामा धोंगडा व पुरवठा निरीक्षक बी. एस. कुळकर्णी यांच्यासह कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविला व ताब्यात घेतलेल्या सात जणांना पोलीस रखवालीतून पळून जाण्यास मदत केली. या प्रकरणी तसेच भारतीय पर्यावरण संरक्षण अधिनियम व जिल्हाधिकाऱ्यांच्या रेतीबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रीवर्धन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या संयुक्त कारवाईत सक्शन पंपासह दोन बोटी, तीन रेतीने भरलेल्या बोटी, सहा व आठ ब्रास रेतीचे ढीग, एक जेसीबी असे बेकायदा रेतीसह तब्बल १९ लाख ५५ हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलीस व महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याची माहिती मिळताच श्रीवर्धन येथील साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
या प्रकरणी वाळूमाफिया मोबिन हसीन परकार, अमजत शेख, अनवर कलंदर सवेल, मन्नमान रहमरण शेख, सादिक उस्मान परकार, सनहुत दिसकार अलिशेख आणि नकसिंग अर्जुन पोमले या सर्व सापोले (बाणकोट) येथील सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (विशेष प्रतिनिधी)
च्या हल्ल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध श्रीवर्धन पोलीस घेत आहेत. रायगडचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेज हक यांनी जिल्ह्यातील बेकायदा उद्योगांवर कठोर कारवाईचे संकेत गेल्या दोन दिवसांपूर्वी दिले होते. त्या संकेतांच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई आहे.