सामान्यांच्या कोंडमाऱ्याला व्यंगचित्रातून वाट

By admin | Published: May 5, 2016 05:41 AM2016-05-05T05:41:53+5:302016-05-05T06:29:40+5:30

सामान्य माणसाच्या कोंडमाऱ्याला वाट करून देण्याचे माध्यम म्हणजे व्यंगचित्रे. अनेक हिंसाचार व्यंगचित्राच्या माध्यमातून टाळता येतात. व्यंगचित्र ही कला गेल्या काही वर्षांत अनवधानाने दुर्लक्षित राहिली

Wandered through the cartoon | सामान्यांच्या कोंडमाऱ्याला व्यंगचित्रातून वाट

सामान्यांच्या कोंडमाऱ्याला व्यंगचित्रातून वाट

Next

- मंगेश तेंडुलकर
ज्येष्ठ व्यंगचित्रकार

सामान्य माणसाच्या कोंडमाऱ्याला वाट करून देण्याचे माध्यम म्हणजे व्यंगचित्रे. अनेक हिंसाचार व्यंगचित्राच्या माध्यमातून टाळता येतात. व्यंगचित्र ही कला गेल्या काही वर्षांत अनवधानाने दुर्लक्षित राहिली आहे. ही कला पत्रकारितेचाच एक भाग; मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात ‘व्यंगचित्र’ हा शब्दच नाही. पूर्वीचा काळ पाहिला, तर व्यंगचित्रे चितारताना एक वैचारिक मुक्तता होती. मात्र, आता चारही बाजूंनी व्यंगचित्रकारांवर दडपण आले आहे. पूर्वी समाजात राजकीय सहिष्णुता पाहायला मिळायची. संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष गुण्यागोविंदाने नांदायचे, हसत-खेळत व्यंगचित्रांना सामोरे जायचे. हे चित्र आता पाहायला मिळत नाही. राजकीय असहिष्णुतेमुळे समाजातील वातावरण ढवळून निघत आहे. सध्याच्या काळात सामाजिक, धार्मिक असहिष्णुतेने जोर धरला आहे. या दडपणाखाली व्यंगचित्र रेखाटायचे म्हटले, तर त्याचे दूरगामी परिणाम काय होतील, याचा विचार व्यंगचित्रकाराला करावा लागतो. कोण जाणे, त्या व्यंगचित्राचा काय अर्थ काढला जाईल? इतकी विध्वंसक परिस्थिती उद्भवली आहे. ‘व्यंगचित्रातून परिस्थिती बिघडली तर, तीवर कोण नियंत्रण ठेवणार?’ असा विचार करावा लागतो. कलेच्या क्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञानाने शिरकाव केला आहे. अ‍ॅनिमेशन हे त्याचेच एक रूप. व्यंगचित्रांत काही करू पाहताना झपाट्याने पैसे मिळविण्याचे साधन बनलेले अ‍ॅनिमेशन आकर्षित करते. नाव आणि प्रसिद्धीच्या भोवऱ्यात तरुण व्यंगचित्रकार गर्तेत जातो. अशा वेळी गरज असते ती पाठिंब्याची, प्रोत्साहनाची. सध्याच्या काळ हा अटीतटीच्या स्पर्धेचा आहे. या स्पर्धेत पुढे जाण्याऐवजी व्यंगचित्रकार जागच्या जागी राहिले, तर ते गोल-गोल फिरत राहतील आणि नुकसान त्यांच्याच पदरी पडेल. नवीन व्यंगचित्रकाराला लवकर प्रोत्साहन मिळत नाही. अशी परिस्थितीच कायम राहिली, तर व्यंगचित्र चितारणारे किती काळ तग धरू शकतील, हा प्रश्न आहेच. आजकाल संगणकारवर व्यंगचित्रे सहज तयार करता येतात. नेत्याचा फोटो स्कॅन केला, की त्यावर आधारित रेखाचित्र काढायचे. ज्यांना प्रत्यक्षात व्यंगचित्रे चितारता येत नाहीत, ते अशा माध्यमातून प्रसिद्धी मिळवू पाहतात. यामुळेच मूळ व्यंगचित्रकला लोप पावण्याची भीती अधिक गहिरी होत आहे. अशा पद्धतीने माणूसच माणसाची गरज संपवू पाहत असेल, तर तो किती काळ उभारी धरणार? कलेसमोर अनेक संकटे, आव्हाने आ वासून उभी आहेत. या आव्हानांना तोंड देऊन पुढे जाईल तोच टिकेल. आव्हाने असणे केव्हाही चांगलेच; त्यात स्वत:च्या कामावर श्रद्धा असलेले कलाकारच टिकतील. नवोदित व्यंगचित्रकार आव्हाने पेलू शकत नाहीत. त्यांना प्रवाहात आणणे ही वृत्तपत्रे आणि नियतकालिकांची जबाबदारी आहे. व्यंगचित्रे रेखाटणे म्हणजे कुणाचे चारित्र्यहनन नव्हे. आता व्यंगचित्र रेखाटणाऱ्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हादेखील दाखल होतो. त्याला देशाबद्दल आत्मीयता वाटली नसती, तर त्याने व्यंगचित्रेच रेखाटली नसती. सरकारप्रणीत दहशतवाद निर्माण करण्याचाच हा प्रयत्न. त्याचाच परिणाम या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात होत आहे. कलेला मोकळीक मिळाल्याशिवाय ती वृद्धिंगत कशी होणार? कारण, व्यंगचित्रकार कधीच स्वत:ची मते व्यक्त करीत नाही. सरकारदरबारी व्यंगचित्रकला दुर्लक्षित झाली आहे. पाठ्यपुस्तकांतूनही व्यंगचित्रे हद्दपार झाली आहेत. खिलाडू वृत्ती बाद होत आहे. व्यंगचित्रे राजकीय नेत्यांना नकोशी असतात. त्यामुळे व्यंगचित्रकारांचे पाय मागे खेचले जातात. सर्वसामान्यांनी या कलेचे महत्त्व समजून तिला पाठिंबा दिल्यास व्यंगचित्रे पुन्हा ताकदीने दिसू लागतील. कलेचे दरवाजे बंद झाले, तर नवीन कलाकार आत येणार तरी कसा? त्यामुळेच नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. चांगल्या हेतूने कलेची आराधना केल्यास ती नक्कीच प्रसन्न होईल आणि पुन्हा फुलू लागेल, असा विश्वास वाटतो.

Web Title: Wandered through the cartoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.