कुस्तीच्या फडात घुमतोय खान्देश कन्येचा शड्डू!
By Admin | Published: February 13, 2017 03:57 AM2017-02-13T03:57:35+5:302017-02-13T03:57:35+5:30
शहरातील नामांकित मल्ल चंद्रकांत (नाना) सैंदाणे यांनी कुस्तीची परंपरा पुढे चालविण्यासाठी मुलगी हर्षालीला प्रशिक्षण दिले. अहोरात्र कष्ट करुन
अनिल मकर / धुळे
शहरातील नामांकित मल्ल चंद्रकांत (नाना) सैंदाणे यांनी कुस्तीची परंपरा पुढे चालविण्यासाठी मुलगी हर्षालीला प्रशिक्षण दिले. अहोरात्र कष्ट करुन हर्षालीनेही ही कला आत्मसात केली.धुळ्याचे नाव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविणारी खान्देशची कन्या असा तिचा आज लौकिक आहे.
सैंदाणे यांची घरची परिस्थिती बेताचीच आहे. वडिलांप्रमाणे आपणही पैलवान व्हावे या इच्छेने हर्षालीने आपल्या पित्याकडे मल्लविद्या शिकविण्याचा हट्ट धरला. तिचा ठाम निश्चय पाहून त्यांनी तिला मल्लविद्येचे धडे देण्यास सुरुवात केली. सुरवातीला जवळच्या लोकांनीही त्यांना हिणविले. परंतु कोण काय म्हणतो याची तमा न बाळगता या पित्याने मुलीचा सराव चालूच ठेवला.
चंद्रकांत सैंदाणे यांना दोन मुलीच आहेत. याची त्यांनी कधी खंत बाळगली नाही किंवा मुलगा-मुलगी असा भेदही केला नाही. दररोज पहाटे चार-साडेचार वाजता मुलीचा व्यायाम घेणे, धावणे, दोर चढणे, कसरत, खुराक आणि कुस्तीतील डावपेच शिकविण्याचे काम ते करत आहेत.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्यावतीने २०१० मध्ये धुळ्यात महिला कुस्ती स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये सैंदाणे यांनी धुळ्यातून सात मुलींना आखाड्यात उतरविले. या स्पर्धेत सलामीची कुस्ती हर्षालीची झाली. मुंबईच्या मुलीला दोन मिनिटात तिने चितपट केले.तेव्हापासून हर्षालीने कधी मागे वळून पाहिलेच नाही. मॅटवरची कुस्ती असो अगर लाल मातीवरील चांगल्या-चांगल्या महिला मल्लांना तिने चितपट केले. कोलंबो (श्रीलंका) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदकही पटकावले. तर राज्यस्तरावर पाच वेळा कांस्यपदके प्राप्त केली. सध्या ती २१ फेब्रुवारी रोजी शिरसा (हरियाणा) येथे होणाऱ्या अखिल भारतीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत तसेच लंडन येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेसाठी मध्यप्रदेशातील भोपाळ येथे कसून तयारी करत आहे.