भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
By यदू जोशी | Published: May 21, 2024 09:42 AM2024-05-21T09:42:11+5:302024-05-21T10:01:27+5:30
जातीपातीचे राजकारणही होते जोरात, पाचव्या टप्प्यातही वर्चस्वासाठी जोरदार चुरस
यदु जोशी -
मुंबई : पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता महाराष्ट्रातील भटकता आत्मा असा केलेला उल्लेख, शरद पवार, उद्धव ठाकरेंना एनडीएसोबत येण्याची त्यांनी दिलेली ऑफर, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला दिलेला बिनशर्त पाठिंबा अशा रंजक विषयांनी राज्यात लोकसभा निवडणुकीचा फड गाजला.
मोदींच्या भटकता आत्मा या शब्दावर शरद पवार यांनी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी माझा आत्मा नेहमीच भटकत राहील. मी स्वत:साठी अस्वस्थ नाही तर महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न याबाबत अस्वस्थ आहे, असे प्रत्युत्तर दिले.
पंतप्रधान मोदींची गुगली
‘उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत व उद्या संकट आले तर त्यांच्या मदतीला मी धावून जाईन’ असे विधान नरेंद्र मोदी यांनी दि. ३ मे रोजी एका मुलाखतीत केले. त्यावरून मोदी हे ठाकरेंशी जुळवून घेत तर नाहीत ना, अशी शंका निर्माण झाली. मात्र आपण मोदींच्या दारात कधीही जाणार नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांचे ‘ते’ विधान
लोकसभा निवडणुकीनंतर अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे विधान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एका मुलाखतीत केले. काँग्रेस आणि आमची विचारसरणी एकच असल्याचे सांगत त्यांनी आपल्या पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचे संकेत दिले का, अशी चर्चा सुरू झाली. पंतप्रधान मोदींनी त्यांना अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षात आणि पर्यायाने एनडीएसोबत येण्याची ऑफर दिली. त्यावरूनही आरोप-प्रत्यारोप रंगले.
जातीपातीच्या जाणिवांनी या निवडणुकीत कधी नव्हे एवढे डोके वर काढले. विशेषत: मराठवाड्यात त्याचा प्रत्यय आला. विदर्भात डीएमके म्हणजे दलित-मुस्लीम-कुणबी या समीकरणाची चर्चा राहिली.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली.
निवडणुकीतील प्रमुख घटना
- मोहिते पाटील घराण्याने भाजपचा हात सोडून शरद पवार यांचा हात धरला.
- नाशिकच्या महायुतीच्या जागेवरून सर्वाधिक घोळ घातला गेला. उमेदवारी न मिळाल्याने छगन भुजबळ यांची नाराजी शेवटपर्यंत कायम असल्याचे चित्र होते.
- ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीशी चर्चा तर केली; पण नंतर स्वतंत्र लढले.
- उद्धवसेनेच्या प्रचारगीतातील जय भवानी आणि हिंदू शब्द वगळण्यास निवडणूक आयोगाने सांगितले. त्याला आव्हान देणारी उद्धवसेनेची याचिका आयोगाने फेटाळून लावली.
- पंतप्रधान मोदी यांनी राज्यात तब्बल १८ सभा घेतल्या, मुंबईत रोड शो केला.
- कांदा निर्यातबंदीच्या मुद्द्यावरून कांदा पट्ट्यात राजकारण तापले.