देवाच्या डोंगरावर पाण्यासाठी भटकंती--डोंगर देवाचा की समस्यांचा - भाग २

By admin | Published: January 28, 2015 10:07 PM2015-01-28T22:07:13+5:302015-01-29T00:15:06+5:30

आठ किलोमीटरची पायपीट : ग्रामस्थांवर आली स्थलांतरणाची वेळ

Wandering water on the mountains of God - The problems of God's mountains - Part 2 | देवाच्या डोंगरावर पाण्यासाठी भटकंती--डोंगर देवाचा की समस्यांचा - भाग २

देवाच्या डोंगरावर पाण्यासाठी भटकंती--डोंगर देवाचा की समस्यांचा - भाग २

Next

शिवाजी गोरे - दापोली -कोकणातील धनगरवाड्या तहानल्या असून, डोंगरदऱ्यात विखुरलेल्या वाडी-वस्तीतील भटक्या धनगर समाजाला पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाल्याने, एक हंडा पाण्यासाठी ७ ते ८ किलारेमीटरची भटकंती सुरु झाली आहे. देवाचा डोंगर येथेही पाणीटंचाई सुरु झाली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उन्हाळ्यातील ४ महिने घरदार सोडून आपल्या कुटुंबियांसह जनावरांना सोबत घेऊन पाण्याच्या ठिकाणी स्थलांतरीत होण्याची वेळसुद्धा काही कुटुंबांवर आली आहे. दापोली, खेड, महाड, मंडणगड हे चार तालुके आणि रत्नागिरी-रायगड या दोन जिल्ह्यांत मोडणाऱ्या देवाच्या डोंगरवासीयांची अवस्था बिकट बनली आहे. देवाच्या डोंगरावरील पाणीटंचाईवर उपाय म्हणून, शासनाकडून फेब्रुवारी महिन्यात टँकरने पाणी पुरवठा केला जातो. परंतु, टँकरने मिळणाऱ्या ४ हंड्याने त्यांची तहान भागत नाही. उर्वरित पण्यासाठी डोंगरदऱ्यात भटकंती करुन पाणी मिळवण्याशिवाय त्यांच्यापुढे सध्यातरी दुसरा कोणताच पर्याय नाही. देवाच्या डोंगरावरील भटक्या धनगर समाजाकडे पूर्वी मोठ्या प्रमाणावर गाई-म्हशी होत्या. परंतु, डोंगरावरील पाणीटंचाईमुळे त्यांची बहुतेक जनावरे दगावली, तर काही गुरे विकण्यात आली.  देवाच्या डोंगरावर चार वाड्या आहेत. या चारही वाड्यांना पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवते. पाणीटंचाईने त्यांच्या डोळ्यात पाणीसुद्धा येते. देवाच्या डोंगरावरील पाणीटंचाईमुळे लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वांना भटकंती करुन पाणी मिळवावे लागते. पाणी मिळवण्यासाठी दिवस-रात्र भटकंती करावी लागते. रात्री पाण्यासाठी हातात काठी व बॅटरी घेऊन बाहेर पडावे लागते.
पहाटे चार वाजल्यापासून महिलांना घराबाहेर पडावे लाते. पाणीच नसल्याने त्यांना घरची कामेसुद्धा करता येत नाहीत. देवाच्या डोंगरावरील भटका धनगर समाज गरीब आहे. पुरेशी शेती नसल्याने त्यांना डोंगराच्या खाली ७ ते ८ किलोमीटरवरच्या गावात जाऊन मजुरी करावी लागते. परंतु, पाणीटंचाईमुळे दिवसभर पाणी भरावे लागत असल्याने कुठे कामाला सुद्धा जाता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.समुद्रसपाटीपासून साडेतीन हजार फूट उंचीवर असणाऱ्या देवाच्या डोंगरावरील भीषण पाणीटंचाईमुळे येथील भटक्या, धनगर समाजाला असह्य वेदना सहन कराव्या लागत आहेत. देवाचा डोंगर, जामगेवाडीतील लोकांच्या भावना तुळशीवाडी वाडीतील लोकांप्रमाणेच आहेत. या वाडीतील विहिरींची पाणीपातळी खालावल्याने देवाच्या डोंगरावरील पाझरणाऱ्या झऱ्यातून तहान भागवण्याची वेळ आली आहे.देवाच्या डोंगरावरील जामगे वाडीतील पाणीटंचाईने उग्र रुप धारण करायला सुरुवात केली असून, डोंगरातील झऱ्यातील पाणी भटकंती करुन मिवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. एका झऱ्यापासून दिवसाला केवळ १० ते १५ हंडे पाणी मिळत असल्याने, या झऱ्यावर दिवस-रात्र नंबर लाऊन आळीपाळीने पाणी भरावे लागत आहे. एक हंडा पाण्यासाठी तासन् तास ताटकळत उभे राहवे लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट करुन पाणी मिळवावे लागल्याने, इतर कामांकडे दुर्लक्ष होत आहे.

पाणीटंचाईमुळे रात्रीचे झऱ्यावर जाऊन पाणी भरावे लागते. काळोखात पाणी भरताना पायाला साप चावला होता. कित्येकदा तर पायाला ठेच लागून पडून हात पाय मोडल्याच्या घटनासुद्धा घडल्या आहेत. दऱ्या डोंगरातून डोक्यावर हंडा घेऊन येताना छाती भरुन येते. पायात गोळे सुद्धा येतात. पाण्यासाठी आमचे हाल होत आहेत. परंतु, सरकारला अजूनही जाग येत नाही. निवडणुका आल्या की देवाच्या डोंगरावर पुढारी येतात. केवळ आश्वासने देऊन जातात. आजपर्यंत कोणीही आमची दखल घेतली नाही.
- मंदार पांडुरंग आखाडे, ग्रामस्थ.
संपूर्ण आयुष्य पाणीटंचाईत काढले. पाण्यामुळे गुरे ढोरे डोळ्यांदेखत तडफडून मेली. देवाच्या डोंगरावरील पाणीटंचाईमुळे अनेक बिऱ्हाडं गाव सोडून बाहेर गेली. कित्येकांची तारांबळ झाली. बायका-मुलं गावाला, तर गडी माणूस रोजीरोटीसाठी बाहेर गावी. गावाकडे गुरं ढोर असल्यामुळे घरी कोणीतरी राहावेच लागते. अनेक मुलांनी शाळा अर्ध्यावर सोडल्या. कारण, पाण्यासाठी हातभार लागावा म्हणून पालक मुलांची शाळा बंद करतात. आम्ही आजही दुर्लक्षित जीवन जगत आहोत.
- कोंडिबा झोरे, ग्रामस्थ.

मदार डोंगरावरील झऱ्यावरच
देवाच्या डोंगरावरील विहिरीचे पाणी जेमतेम जानेवारी महिन्यापर्यंत पुरते. फेब्रुवारीनंतर मात्र, देवाच्या डोंगराला पाणीटंचाईच्या प्रचंड झळा बसायला लागतात. देवाच्या डोंगरावरील विहिरीचे पाणी संपले की, येथील लोकांची पाण्यासाठी भटकंती सुरु होते. वाटीने खरवडून पाणी भरण्याची वेळ त्यांच्यावर येते. देवाचा डोंगर जामगेवाडीतील वस्तीसाठी दोन विहिरी आहेत. मात्र जानेवारीतच या विहिरी तळ गाठतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मदार असते, ती डोंगरावरील झऱ्यावरच.
टँकरमधील पाणीही पडते अपुरे
देवाच्या डोंगरावर पाणीटंचाई सुरु झाली की, टँकरने पाणी पुरवठा केला जातो. देवाच्या डोंगरावरील पाणीटंचाईवर एकमेव उपाय म्हणजे, टँकरने पाणीपुरवठा. एका दिवसाला एक टँकर अशा स्वरुपात पाणी पुरवठा केला जातो. मात्र, टँकरमधून मिळणारे ४ हंडे पाणी पुरेसे नसल्याने तहान भागवण्यासाठी या वाडीला डोंगर चढून उतरुन जीवघेण्या पाऊलवाटेने भोळवली धरणातून सुमारे साडेतीन हजार फूट डोंगर चढून हंडाभर पाणी आणवे लागते.

Web Title: Wandering water on the mountains of God - The problems of God's mountains - Part 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.