वानखेडेंच्या लग्नपत्रिकेत वडिलांचे नाव दाऊद; मलिकांच्या मुलीने ट्विटरवर शेअर केली लग्न पत्रिका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 05:32 AM2021-11-21T05:32:17+5:302021-11-21T05:33:00+5:30
समीर वानखेडे यांचा ७ डिसेंबर २००६ रोजी अंधेरी येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे शबाना कुरेशी यांच्याशी निकाह झाला आहे.
मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक यांनीही मैदानात उडी घेत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या पहिल्या लग्नाची पत्रिका ट्विटरवर शेअर केली आहे. यात समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असे लिहिलेले आहे.
समीर वानखेडे यांचा ७ डिसेंबर २००६ रोजी अंधेरी येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे शबाना कुरेशी यांच्याशी निकाह झाला आहे. समीर हे दाऊद आणि जहिदा वानखेडे यांचे सुपुत्र असल्याचा उल्लेख या निकाहनाम्याच्या आमंत्रण पत्रिकेमध्ये करण्यात आला आहे, तर दुसरीकडे नवाब मलिक यांची दुसरी मुलगी सना मलिक शेख यांनीही विवाह दाखला शेअर केला. ज्यामध्ये यास्मीन अझीज खान, निखिल छेडा आणि ग्लेन पटेल हे साक्षीदार असल्याचे दिसत आहे.
पत्रिकेबाबत माहिती नाही - समीर वानखेडे
ही आमंत्रण पत्रिका आपली नसून पहिल्या पत्नीच्या कुटुंबीयांची आहे. त्यामुळे त्यांनी काय छापले, काय नाही हे आपल्याला माहिती नसल्याचा दावा समीर वानखेडे यांनी केला आहे.