आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 05:58 AM2024-10-22T05:58:25+5:302024-10-22T05:59:11+5:30
राज्यातील निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विधानसभा निवडणुकांसाठीची अधिसूचना उद्या, मंगळवारी जारी होईल. २२ तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. २९ ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. राज्यातील निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
अधिसूचना जारी झाल्यानंतर विहित नमुन्यातील उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून सुरू होते यासाठी राज्यभरात तयारी पूर्ण झाली असल्याचे मनोहर पारकर यांनी सांगितले. दि. ३० ऑक्टोबरला अर्जाची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत दि. ४ नोव्हेंबर असून, त्यानंतर राज्यातील उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.
शनिवार-रविवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आठ दिवसांची मुदत असली तरी दुसरा व चौथा शनिवार तसेच रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशी अर्ज दाखल करता येत नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षात अर्ज भरण्यासाठी सहा दिवस मिळणार आहेत. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे अर्ज देता येईल.