डोमिसाईल प्रमाणपत्र काढायचंय; पाहा कसे आणि कुठे मिळते?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 04:43 PM2022-02-28T16:43:12+5:302022-02-28T16:45:12+5:30
अनेकदा महत्त्वाच्या कामादरम्यान अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्राची गरज लागते आणि शेवटच्या क्षणी धावाधाव करावी लागते.
सुहास शेलार
तहसीलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र वा ‘आपले सरकार’ या शासनाच्या संकेतस्थळावरून वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र काढता येते. https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध आहे.
कोणती कागदपत्रे लागतात?
ओळखीचा पुरावा म्हणून पॅनकार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, अर्जदाराचे छायाचित्र, निमशासकीय ओळखपत्र, रोजगार हमी योजना ओळखपत्र, वाहनचालक परवाना यांचा वापर करता येऊ शकतो.
तर पत्त्याचा पुरावा पासपोर्ट, वीज देयक, दूरध्वनी देयक, शिधापत्रिका, भाडेपावती, मालमत्ता कर पावती, मालमत्ता नोंदणी उतारा, ७/१२ आणि ८ अ उतारा यांचा वापर करता येईल. वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र, सेवा पुस्तिका (शासकीय/निमशासकीय कर्मचारी) यापैकी काही कागदपत्रे आवश्यक आहेत. सामान्यत: यासाठी केवळ ३४ रुपये शुल्क आकारले जाते.
रहिवासाचा पुरावा
ग्रामसेवक, तलाठी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून घेतलेला रहिवासी दाखला आणि स्वयंघोषणापत्र
विद्यार्थ्यांसाठी
अर्जदार १८ वर्षांपेक्षा कमी असल्यास बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचे डोमिसाईल प्रमाणपत्र, शाळा प्रवेशाचा पुरावा.
महत्त्वाच्या कामादरम्यान अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्राची गरज लागते आणि शेवटच्या क्षणी धावाधाव करावी लागते. हे प्रमाणपत्र मिळण्यास सामान्यपणे ८ ते १५ दिवसांचा कालावधी लागत असल्याने काहींच्या नोकरीच्या संधी हुकतात, आवडत्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही किंवा शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागते. यापासून वाचण्यासाठी आजच डोमिसाईल प्रमाणपत्रासाठी अर्ज करा.
आपले सरकार संकेतस्थळावर किंवा तहसीलदार कार्यालयात वरील सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर १५ दिवसांच्या कालावधीत तो मंजूर होऊन वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र मिळते. काही कारणास्तव प्रमाणपत्र प्राप्त होण्यास उशीर झाल्यास १५ दिवसानंतर ‘आपले सरकार’च्या संकेतस्थळावर लॉग इन करुन अपिल अर्ज सादर करता येतो.
- अधिकृत संकेतस्थळ https://aaplesarkar.mahaonline.gov.in/
- संकेतस्थळावर नवीन वापरकर्ता नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे.
- तेथे नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाकून लॉग इन करावे.
- लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डवर विविध विभाग दिसतील. त्यातील महसूल विभाग आणि पुढे पुढे महसूल सेवा हा पर्याय निवडा.
- त्यानंतर वय, राष्ट्रीयत्व व डोमिसाईल प्रमाणपत्र हा पर्याय निवडावा.
- तेथे आवश्यक कागदपत्रांची यादी सादर होईल.
- पुढे वैयक्तिक माहिती, पत्ता आणि अन्य माहिती सादर करावी.
- संकेतस्थळावर अपलोड करावयाची कागदपत्रे ७५ ते ५०० केबीच्या आत असावीत.
- फोटो आणि सही अपलोड केल्यानंतर अर्ज सादर करावा.
- शुल्क भरल्याची पावती प्रमाणपत्र मिळेपर्यंत संग्रही ठेवावी.