वॉन्टेड अखिलेश पोलिसांच्या जाळ्यात
By admin | Published: November 5, 2016 06:32 AM2016-11-05T06:32:41+5:302016-11-05T06:32:41+5:30
मीरा रोड बोगस कॉलसेंटरप्रकरणी वॉन्टेड असलेला अखिलेश अजय सिंग (२९) याला बेड्या घालण्यात ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा-१च्या पथकाला अखेर यश आले.
ठाणे : मीरा रोड बोगस कॉलसेंटरप्रकरणी वॉन्टेड असलेला अखिलेश अजय सिंग (२९) याला बेड्या घालण्यात ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा-१च्या पथकाला अखेर यश आले. या प्रकरणी आतापर्यंत ५० जणांना अटक झाली आहे. अखिलेशला ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अखिलेश हा मीरा रोड येथील त्याच्या घरी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश खुस्पे यांच्या पथकाने सापळा रचून त्याला गुरुवारी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने मीरा रोड येथील हरीओम आय.टी. पार्क बिल्डिंगचा दुसरा आणि चौथा माळा त्याचा मेहुणा चंदन अजित सिंह याच्या नावाने तसेच पाचवा आणि सातवा माळा त्याचा मित्र सनी परियाल याच्या नावे स्वत: आर्थिक व्यवहार करून भाडेकरारावर घेतल्याची कबुली दिली. यावरून त्याचा या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला नंतर अटक केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. ४ आॅक्टोबर रोजी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातील मीरा रोड येथील हरीओम आय.टी. पार्क, ओसवाल पॅरेडाईज आणि एम बाले हाउस येथे ठाणे गुन्हे शाखेने छापा टाकला होता. या प्रकरणी बेकायदेशीर कॉल सेंटरद्वारे अमेरिकन नागरिकांना इंटरनल रेव्हेन्यु सर्व्हिसचे अधिकारी असल्याची बतावणी करून त्यांना तुम्ही टॅक्स डिफॉल्टर असल्याचे खोटे सांगत तुम्हास अटक होऊन शिक्षा होईल, असे सांगून अमेरिकतील नागरिकांकडून तडजोडीअंती रक्कम स्वीकारून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
काशिमीरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी एकूण ४९ जणांना अटक झाली होती. या प्रकरणी पाहिजे असलेल्या अखिलेशला अटक केल्याने हा आकडा ५०वर गेला आहे. (प्रतिनिधी)