Waqf Bill: वक्फ विधेयक मंजूर झाल्यानंतर रझा अकादमी आक्रमक; मुंबईत बैठक, सरकारला दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 16:55 IST2025-04-03T16:55:07+5:302025-04-03T16:55:40+5:30
वक्फ विधेयक मंजूर झाल्यानं मुस्लिमांमध्ये नाराजी आहे. आम्ही आमच्या संपत्तीचं रक्षण करू, कायद्याच्या चौकटीत राहून आम्हाला जे काही करायचे ते करू असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Waqf Bill: वक्फ विधेयक मंजूर झाल्यानंतर रझा अकादमी आक्रमक; मुंबईत बैठक, सरकारला दिला इशारा
मुंबई - लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर मुंबईत रझा अकादमीकडून बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मोठ्या संख्येने मौलवी आणि मुस्लीम समाजातील कार्यकर्ते हजर होते. वक्फ विधेयक आम्हाला मंजूर नाही. आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ, वेळेप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारीही आहे असा इशारा रझा अकादमीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
याबाबत मौलवी खलिदी रहमान नूर यांनी म्हटलं की, वक्फ विधेयक मंजूर झाल्यानंतर जे जल्लोष करतायेत ते RSS च्या इशाऱ्यावर नाचणारे आहेत. ते त्यांनी पाळलेले कुत्रे आहेत. भारतातील ९९ टक्के मुसलमान या विधेयकामुळे नाराज आहे. हा आमचा धार्मिक प्रश्न असून आम्ही त्यासाठी कुठल्याही कुर्बानीसाठी तयार आहोत. आम्ही हे मान्य करणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरू, सुप्रीम कोर्टात जाऊ. जितका विरोध असेल तितका करू. नरेंद्र मोदी, अमित शाह खोटारडे आहेत. मुलींवर सर्वाधिक अत्याचार भाजपा नेते करत आहेत. त्यामुळे ते जे काही बोलतायेत ते खोटे आहे. जर आमच्या भल्यासाठी काम करत असते तर आम्हालाही विश्वासात घेतले असते, चर्चा केली असती. गरीब मुसलमानांसाठी नव्हे तर स्वत:साठी आणि त्यांच्या मित्रांसाठी काम केले जात आहे असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय जेव्हापासून संसदेत वक्फ सुधारणा विधेयकासाठी संयुक्त संसदीय समिती बनली तेव्हापासून आम्ही याचा विरोध करत आहोत. मरेपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू. बिहारच्या निवडणुकीत नितीश कुमारांना यंदा चांगलाच धडा मिळेल. मुसलमान त्यांना धडा शिकवेल. नितीश कुमार यांच्याकडून आम्हाला अपेक्षा होती. मात्र हे विधेयक मंजूर करण्यात त्यांचा वाटा आहे. वक्फ विधेयक मंजूर झाल्यानं मुस्लिमांमध्ये नाराजी आहे. आम्ही आमच्या संपत्तीचं रक्षण करू, कायद्याच्या चौकटीत राहून आम्हाला जे काही करायचे ते करू. संसदेने पारित केलेले विधेयक आम्हाला मान्य नाही असं एका पदाधिकाऱ्याने म्हटलं.
दरम्यान, वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठवू. सरकार सांगतंय एक आणि करतेय दुसरे, आम्हाला विधेयकावर १ टक्केही विश्वास नाही. वक्फच्या जमिनी हडपल्या जाणार आहेत. मुस्लिमांची संपत्ती सुरक्षित राहणार नाही. आम्हाला सरकारवर विश्वास नाही. मागील इतिहास पाहता या सरकारवर भरवसा नाही. आम्ही आजच्या बैठकीत सर्व कायदेशीर मार्गाबाबत चर्चा केली. यावर आम्ही सुप्रीम कोर्टात चॅलेंज करू असं सय्यद नूरी यांनी सांगितले. यावेळी रझा अकादमीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.