‘वक्फ’ जमिनीचे व्यवहार बेकायदा
By Admin | Published: May 12, 2016 03:26 AM2016-05-12T03:26:51+5:302016-05-12T03:26:51+5:30
सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मुंबईच्या धर्मादाय आयुक्तांनी वक्फ बोर्डाच्या मालकीच्या मुंबईतील नऊ जागा १०७ कोटी ५५ लाख एवढ्या नाममात्र दराने विकल्याची माहिती समोर आली आहे
अतुल कुलकर्णी, मुंबई
सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मुंबईच्या धर्मादाय आयुक्तांनी वक्फ बोर्डाच्या मालकीच्या मुंबईतील नऊ जागा १०७ कोटी ५५ लाख एवढ्या नाममात्र दराने विकल्याची माहिती समोर आली आहे. असे एकूण ७० व्यवहार एकट्या मुंबईत झाले आहेत. हे सगळे विक्री व्यवहार आणि लीज परवानग्या बेकायदेशीर ठरविण्याचे आदेश अल्पसंख्याक विभागाचे मंत्री एकनाथ खडसे यांनी दिले आहेत.
ज्या नऊ बेकायदा व्यवहारांची माहिती समोर आली आहे़ त्यातील आठ व्यवहार युती सरकारच्या काळातील आहेत. राज्यातील वक्फच्या सगळ्या जमिनींच्या सातबाऱ्यावर ‘वक्फ प्रतिबंधित सत्ताप्रकार’ अशी नोंद करण्याचे काम तातडीने सुरू करा. त्यासाठी १३ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशाचे तातडीने पालन करा, असेही खडसे यांनी बजावले आहे. ज्या धर्मादाय आयुक्तांनी हे असे व्यवहार केले आहेत त्यांच्यावर विधी व न्याय विभागातर्फे तातडीने कारवाई करण्यात यावी, असे सचिवांना सांगितल्याचे खडसे लोकमतला सांगितले.
या विक्री व्यवहाराने सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान झाला असून, धर्मादाय आयुक्तांविरुद्ध कंटेमप्ट प्रोसेडिंग दाखल करण्याचे आदेशही खडसे यांनी दिले आहेत. ११ मे २०१२ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वक्फ बोर्डाच्या ताब्यात असणारी जमीन विकता येत नाही किंवा ती लीजवरही देता येत नाही. मात्र वक्फ बोर्डाच्या कारभारात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे समोर आल्यानंतर निवृत्त न्यायमूर्ती शेख यांची चौकशी समिती नेमली गेली. मंत्री खडसे यांनी या अहवालावर आधारित उपाययोजनांसाठी बैठक बोलावली तेव्हा यातील काही नावे समोर आली आहेत. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही मुंबईतल्या वक्फच्या मालकीच्या ७० जमिनी विकल्या गेल्या. काही जमिनी म्हाडा, सिडको, महापालिका आणि खासगी व्यक्ती अथवा संस्थांना हस्तांतरीतही केल्या. त्यातल्या काही जमिनींवर मुंबईतल्या बिल्डरांनी पुनर्विकासाचे प्रस्तावही सादर केले. पालिकेने त्यांना मान्यता दिली एवढेच नाही तर काही प्रस्ताव राज्य सरकारकडे आले व राज्य सरकारनेही त्या प्रस्तावांना माहिती दिल्याचे अहवालातून समोर आल्याचे खडसे यांनी सांगितले.धर्मादाय आयुक्तांच्या विरोधात सर्वाेच्च न्यायालयात कंटेम्प्ट प्रोसेडिंग दाखल करा.
सर्व विश्वस्त व वक्फच्या जमिनी विकत घेणारे व त्यात सहभागी असणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढणार.
धर्मादाय आयुक्तांना नोटिसा देऊन वक्फ मिळकती किंवा वक्फ प्रकरणात हस्तक्षेप करू नये व वक्फ मिळकतीच्या रेकॉर्डमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करू नयेत.
महसूल विभाग व दुय्यम निबंधक कार्यालयाला निर्देश देऊन वक्फ मिळकतीसंबंधी धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी न करता वक्फ बोर्डाच्या परवानगीशिवाय मालमत्तांमध्ये कोणतेही बदल किंवा नोंदणी अथवा खरेदी विक्री करू नये.
>हे आहेत मुंबईतले नऊ खरेदीदार
नावरक्कम (लाखात)आदेशाची तारीख
हार्ड रॉक प्रॉपर्टीज प्रा. लि.५२.००२८-०८-२०१४
सैफी बुरानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट११०.००२६-११-२०१५
सैफी बुरानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट६००.००२६-११-२०१५
सैफी बुरानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट१००.००२६-११-२०१५
ग्लोबल टेक पार्क प्रा. लि.९२००.००२३-११-२०१५
मे. सावंत बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स१५०.००१७-०४-२०१५
एम.जे. बिल्डर्स, मुंबई२०.५११०-०८-२०१५
क्रेआॅन्स प्रापर्टीज डिझायनर प्रा. लि. ४५०.००२५-०८-२०१५
प्रियाली बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स, मुंबई७३.१६०४-०४-२०१५