सीमेवर युद्धसज्जता!
By admin | Published: September 30, 2016 02:49 AM2016-09-30T02:49:14+5:302016-09-30T02:49:14+5:30
काश्मीरच्या उरीमधील दहशतवादी हल्ला आणि त्याच्या प्रत्युत्तरात बुधवारी रात्री भारताद्वारे पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याच्या
नवी दिल्ली/चंदिगढ/मुंबई : काश्मीरच्या उरीमधील दहशतवादी हल्ला आणि त्याच्या प्रत्युत्तरात बुधवारी रात्री भारताद्वारे पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याच्या घटनेनंतर निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोबतच आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या (आयबी) सहा जिल्ह्यांमधील दहा किमीच्या परिसरातील गावे रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
देशातील सर्व नौदलाच्या हवाई दलाच्या तळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, तिन्ही दलांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर पंजाब, राजस्थान, जम्मू व काश्मीर येथील सीमांवरील सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. या निर्णयानंतर पंजाबच्या पाक सीमेवरील लोकांनी गावे सोडण्यास सुरुवात केली असून, त्यांची अन्यत्र राहण्याची सोय करण्यात येत आहे. काहींनी मात्र अन्य नातेवाईकांकडे आसरा घेण्याचे ठरवले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क/वृत्तसंस्था)
पर्यटकांसाठीचे कार्यक्रमही रद्द
सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) वाघा सीमेवर नियमित होणारा बिटिंग रिट्रीट कार्यक्रमही रद्द केला आहे. मुंबईत १ व २ आॅक्टोबर रोजी नौदलाने लहान मुले, एनसीसी विद्यार्थी तसेच पर्यटक यांच्यासाठी नौदलाच्या बोटींवर आयोजित केलेले कार्यक्रमही रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले आहे.
दहशतवाद्यांच्या हालचालींवर लक्ष
काश्मीरमध्ये पाकच्या सीमेनजीक राहणाऱ्या लोकांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी प्रशासनाला दिले आहेत. सर्जिकल स्ट्राइकची प्रतिक्रिया या भागात उमटेल, अशी भीती मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानी लष्कर वा तेथील दहशतवादी यांच्या हालचालींवर बीएसएफ, लष्कर व प्रशासन लक्ष ठेवून आहे.