वानखेडे हे भाजपचे म्होरके; नवाब मलिक यांचा नव्याने आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 09:00 AM2021-10-22T09:00:25+5:302021-10-22T09:02:50+5:30
प्रसिद्धीसाठी बनावट प्रकरणे दाखल करून लोकांना अडकवण्याचे ते काम करतात. त्या न्यायालयात टिकत नाहीत, असा आरोप अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला. बोगस अधिकाऱ्यांच्या बोगस कारवाया हळूहळू समोर आणणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
वडगाव मावळ (जि. पुणे) : फिल्म इंडस्ट्रीच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम भाजप करीत आहे. एनसीबीचे समीर वानखेडे हे भाजपचे म्होरके आहेत. प्रसिद्धीसाठी बनावट प्रकरणे दाखल करून लोकांना अडकवण्याचे ते काम करतात. त्या न्यायालयात टिकत नाहीत, असा आरोप अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला. बोगस अधिकाऱ्यांच्या बोगस कारवाया हळूहळू समोर आणणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
वडगाव मावळ येथे अल्पसंख्याक विभागीय कार्यकर्ता मेळावा व मार्गदर्शन शिबिरासाठी ते गुरुवारी आले होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, या बोगसगिरीबाबत अनेक पुरावे आहेत. येणाऱ्या काळात आणखी पुरावे सादर करणार आहे. या संदर्भात चालणारे तोडपाणी मालदीव आणि दुबईत चालते. दहशत निर्माण करण्यासाठी सध्या मंत्री, नेते, कार्यकर्ते यांची चौकशी करून केंद्र सरकार बोगसगिरी करीत आहे. यंत्रणेचा कितीही गैरवापर केला तरी महाविकास आघाडीतील मंत्री, नेते, कार्यकर्ते घाबरणार नाहीत.
बंगालच्या निवडणुकीत हेच हत्यार त्यांनी वापरले. तिथल्या जनतेने त्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिले. महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी हे पाहत आहे. आगामी काळात बंगाल, महाराष्ट्र व पंजाब ही तिन्ही राज्ये त्यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत.
- नवाब मलिक, अल्पसंख्याक विकास मंत्री