वॉर्ड : के-पश्चिम-भाजपाचे सेना आणि काँग्रेससमोर आव्हान

By admin | Published: January 30, 2017 09:55 PM2017-01-30T21:55:39+5:302017-01-30T21:55:39+5:30

महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान पश्चिम उपनगरातील के-पश्चिम विभागात भाजपाचे शिवसेना आणि काँग्रेससमोर कडवे आव्हान असून

Ward: Challenge against the K-West-BJP army and the Congress | वॉर्ड : के-पश्चिम-भाजपाचे सेना आणि काँग्रेससमोर आव्हान

वॉर्ड : के-पश्चिम-भाजपाचे सेना आणि काँग्रेससमोर आव्हान

Next

मनोहर कुंभेजकर / मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान पश्चिम उपनगरातील के-पश्चिम विभागात भाजपाचे शिवसेना आणि काँग्रेससमोर कडवे आव्हान असून, आरक्षणामुळे येथील १३ प्रभागांपैकी ९ प्रभाव महिलांसाठी राखीव झाल्याने, येथून नवदुर्गा निवडून येणार आहेत.

अंधेरी (प.) विधानसभा आणि वर्सोवा विधानसभा असे दोन विधानसभा मतदारसंघ या विभागात येतात. अंधेरीचे प्रतिनिधित्व भाजपाचे आमदार अमित साटम, तर वर्सोव्याचे प्रतिनिधित्व भाजपाच्या आमदार भारती लव्हेकर करत आहेत. १९७७ साली जनता पार्टीचे आमदार ते जनसंघाचे कार्यकर्ते रमेश शेठ गेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते. २५वर्षांची शिवसेना-भाजपाची युती तुटल्यामुळे भाजपाचे कमळ या दोन्ही विधानसभेत फुलले. वर्सोवा विधानसभेत शिवसेनेच्या उमेदवार राजुल पटेल यांचा निवडणूक अर्ज बाद झाल्याने, या ठिकाणी भाजपा-एमआयएम अशी लढत झाली. भारती लव्हेकर या सुमारे २६ हजार मतांनी विजयी झाल्या. अंधेरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार आणि कामगार नेते जयवंत परब यांचा अमित साटम यांनी पराभव करून, ते येथून आमदार म्हणून विजयी झाले. २०१२ च्या पालिका निवडणुकीत येथून भाजपाचे अमित साटम आणि दिलीप पटेल हे दोन नगरसेवक निवडून आले होते. मात्र, यंदाच्या पालिका निवडणुकीत भाजपाच्या नगरसेवकांची जास्त संख्या वाढण्याची चर्चा येथे आहे.

खासदार गजानन कीर्तिकर आणि आमदार अनिल परब यांनी येथे लक्ष केंद्रित केले आहे. परिणामी, येथील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. ‘मातोश्री’ने येथील पालिका निवडणुकीची जबाबदारी कीर्तिकर यांच्यावर सोपवली आहे. दुसरीकडे माजी खासदार गुरुदास कामत यांच्या येथील कार्यालयातील गर्दी वाढत असून, राजकीय चर्चांना उधाण आले आहे आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी येथे काँग्रेसचे अधिकाधिक नगरसेवक निवडून येतील, असा दावा केला आहे. दरम्यान, एमआयएम येथे प्रयत्नशील असून, मनसेसह राष्ट्रवादीची ताकद अद्याप येथे प्रत्ययास आलेली नाही. परिणामी, भाजपा, सेना आणि काँग्रेस यांच्यात सध्या तरी जोरदार चुरस आहे. येथे भाजपाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी मेहनत सुरू असल्याचे, माजी उपमहापौर अरुण देव यांनी सांगितले असून, १९९७च्या पालिका निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे मातब्बर उमेदवार दिवंगत पुष्पकांत म्हात्रे यांचा पराभव करत, पहिल्यांदा येथे कमळ फुलवले होते.

...........................................

विभागाची ओळख

मेट्रो रेल्वे, इस्कॉन मंदिर, जुहू चौपाटी, सातबंगला, वेसावे कोळीवाडा, वेसावे-मढ जेट्टी, शहाजी राजे क्रीडा संकुल ही ठिकाणे विभागाची वैशिष्ट्य आहेत.

...........................................

के-पश्चिम : ५९ ते ७१ प्रभाग आरक्षण

५९ महिला अनुसूचित जमाती

६० खुला

६१ महिला सर्वसाधारण

६२ पुरुष ओबीसी

६३ महिला सर्वसाधारण

६४ महिला सर्वसाधारण

६५ महिला ओबीसी

६६ महिला सर्वसाधारण

६७ महिला ओबीसी

६८ खुला

६९ महिला सर्वसाधारण

७० महिला सर्वसाधारण

७१ खुला

...........................................



५९ - हा प्रभाग अनुसूचित महिलांसाठी राखीव झाला आहे. येथे सर्व पक्ष चांगल्या महिला उमेदवाराच्या शोधात आहे. वेसावे महापालिकेतील शिक्षिका खोपडे यांचे नाव शिवसेनेतर्फे चर्चेत आहे.



६० - स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे येथून प्रमुख दावेदार आहेत. भाजपातून येथून कमलेश यादव, हेमांगी गढवी, ममता झा, अजय महेश्वरी, राज यादव, काँग्रेसमधून नगरसेविका ज्योत्स्ना दिघे यांचे नाव चर्चेत आहे. फणसे यांच्यासमोर महेश मलिक आणि परमजीत सिंग, तर मनसे सचिन गाडे, समीर देसाई यांची नावे चर्चेत आहेत.



६१ - शिवसेनेतर्फे माजी नगरसेविका राजुल पटेल या दावेदार आहेत, तर विद्यमान सेना नगरसेवक राजू पेडणेकर यांच्या पत्नी रचना पेडणेकर यांचे नाव चर्चेत आहे. भाजपातर्फे उर्मिला गुप्ता, राणी आर्या, मनसे अजय कांबळे, काँगेसतर्फे मनोरमा सिंग यांची नावे चर्चेत आहेत.



६२ - काँग्रेसचे नगरसेवक बाळा आंबेरकर, शिवसेनेचे नगरसेवक राजू पडणेकर यांची नावे चर्चेत आहेत. चंगेज मुलतानी हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून, ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.



६३ - काँग्रेसतर्फे प्रतिभा सिंग, भाजपातर्फे रंजना पाटील हे दावेदार असून, आकृती प्रसाद हे नाव चर्चेत आहे. शिवसेनेतर्फे उपविभागप्रमुख विष्णू कोरगावकर यांच्या पत्नी वर्षा कोरगावकर इच्छुक आहेत.



६४ - शिवसेनेतर्फे शाखाप्रमुख हारून खान यांच्या पत्नी शाहिदा हारून खान दावेदार आहेत. भाजपातर्फे सरिता राजपुरे, माया राजपूत, काँग्रेसतर्फे ज्योत्स्ना दिघे यांची नावे चर्चेत आहेत.



६५ - भाजपातर्फे सोना साने, माया राजपूत, प्रीती साटम, शिवसेनेतर्फे शाखाप्रमुख प्रसाद आयरे यांच्या पत्नी नूतन आयरे, काँग्रेसतर्फे माजी नगरसेवक इस्माइल मकवाना यांची मुलगी किंवा पत्नी खतीजा मकवाना, मंजुळा लांजेकर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे, २५ हजार अल्पसंख्याक मतदार असलेल्या या प्रभागात एमआयएम उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे.



६६ - काँग्रेसतर्फे विद्यमान नगरसेवक मोहसीन हैदर यांच्या पत्नी, तसेच खतिजा मकवाना इच्छुक आहेत. शिवसेनेतर्फे महिला उपविभाग संघटक संजीवनी घोसळकर, एमआयएमतर्फे आरिफ खान यांच्या पत्नी तर भाजपाकडून गुजराथी किंवा जैन चेहरा येण्याची शक्यता आहे.



६७ - शिवसेनेतर्फे भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांची सून प्राची परब, महिला शाखा संघटक पूजा पाटील यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसतर्फे नगरसेविका वनिता मारुचा, बीना फर्नांडिस यांची नावे चर्चेत आहेत.



६८ - शिवसेनेतर्फे माजी उपविभागप्रमुख सुनील दळवी, के-पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष संजय पवार, उपविभागप्रमुख राजेश शेटये, शाखाप्रमुख अनिल राऊत, स्थानिक शाखाप्रमुख सुधाकर अहिरे, सचिनशेठ शिवेकर इच्छुक आहेत. काँग्रेसमधून बाळा आंबेरकर यांच्यासह माजी आमदार बलदेव खोसा यांच्या मर्जीतले इंद्रपाल सिंग यांची नावे चर्चेत आहेत.



६९ - काँग्रेसमधून भावना जैन, माजी आमदार अशोकभाऊ जाधव आपल्या मुलीसाठी प्रयत्नशील आहेत. भाजपातून हेमा त्रिवेदी, प्रीती गांधी, रूपा राणा याचे नाव चर्चेत असून, येथील नागरिकांनी आपला उमेदवार म्हणून भाजपातर्फे रेणू हंसराज यांचा आग्रह धरला आहे.



७० - काँग्रेसतर्फे विनिता व्होरा, आरती जनावळे, महिला उपविभाग संघटक स्वाती घोसाळकर यांची नावे चर्चेत आहेत.



७१ - काँग्रेसतर्फे माजी नगरसेवक जयंती सिरोया, श्रीकांत यादव, शिवसेनेकडून उपविभागप्रमुख सुनील भागडे, जितेंद्र जनावळे, शाखाप्रमुख शरद प्रभू, काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेत आलेले बबलू बारुतका यांची नावे चर्चेत आहेत. भाजपातर्फे अनिसा मकवानी, राजेश मेहता यांची नावे चर्चेत आहेत.

Web Title: Ward: Challenge against the K-West-BJP army and the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.