प्रभाग रचना होणार २५ नोव्हेंबरला जाहीर
By admin | Published: November 4, 2016 01:30 AM2016-11-04T01:30:55+5:302016-11-04T01:30:55+5:30
महापालिका प्रारूप प्रभाग रचनेवरील सूचना आणि हरकतींचा शासकीय सोपस्कार निवडणूक आयोगाने पूर्ण केला.
पिंपरी : महापालिका प्रारूप प्रभाग रचनेवरील सूचना आणि हरकतींचा शासकीय सोपस्कार निवडणूक आयोगाने पूर्ण केला. सुनावणीचा अहवाल १९ नोव्हेंबरला निवडणूक आयोगाकडे देण्यात येणार असून, २५ नोव्हेंबरला अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे प्राधिकृत अधिकारी व राज्याचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांनी दिली.
फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्यात आली. त्यावरील सूचना आणि हरकतींविषयी आज आॅटो क्लस्टर सभागृहात सुनावणी झाली. या वेळी कुंटे यांच्यासह विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी गुट्टूवार, जिल्हाधिकारी सौरभ राव, आयुक्त दिनेश वाघमारे, निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने आदी उपस्थित होते. एकू ण १४३० सूचना आणि हरकतींपैकी १३०० हरकती या तळवडे भागातील होत्या. त्यामुळे सभागृह भरले होते. जागा अपुरी असल्याने काही नागरिक उभेही राहिले. समितीने या हरकतदारांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर अन्य भागातील सूचना आणि हरकतदारांचे म्हणणे निवडणूक आयोगाने ऐकून घेतले. तळवडे आणि चिखलीची मोडतोड करून प्रभागरचना चुकीची केली आहे. हे नागरिकांनी समितीच्या लक्षात आणून दिले. एकूण २५ जणांनी आपले म्हणने मांडले. तळवडेतील सूचना आणि हरकतींनंतर सुनावणी झाली. सायंकाळी साडेपाचपर्यंत हे काम सुरू होते. (प्रतिनिधी)
>हरकतदारांनी आपली बाजू मांडली. समितीनेही नागरिकांची बाजू समजून घेतली आहे. याबाबतचा अहवाल येत्या १९ तारखेला निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर २५ नोव्हेंबरला अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात येईल.
- सीताराम कुंटे, प्रधान सचिव