वऱ्हाडाची बस ट्रेलरला धडकली
By admin | Published: June 3, 2017 04:11 AM2017-06-03T04:11:49+5:302017-06-03T04:11:49+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी रात्री खोपोली हद्दीतील बोरघाटात मुंबईकडे निघालेल्या बसचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला
लोकमत न्यूज नेटवर्क
वावोशी : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी रात्री खोपोली हद्दीतील बोरघाटात मुंबईकडे निघालेल्या बसचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला. बसने जवळपास तीनदा पलटी मारल्याने २६ प्रवासी जखमी झाले. यात चालक व एका वृद्ध महिलेसह पाच जण गंभीर जखमी झाले.
मुंबईतील कुटुंब लग्नासाठी पुण्याला बसने गेले होते. मुंबई-पुणे महामार्गावरून मुंबईच्या दिशेने परतताना, रात्री ८च्या दरम्यान बस बोरघाटात आली असता बसचा ब्रेक निकामी झाला. भरधाव वेगात असणारी ही बस पुढे असणाऱ्या ट्रेलरला मागून धडकली. बसने तीनदा पलटी मारल्याने झालेल्या अपघातात भागाबाई कुडे (६५, रा.मुंबई), पौर्णिमा गायकवाड (२६, रा.वाकड, पुणे), शहाबाई पवार (५५, रा.मुंबई), ज्योती विश्वकर्मा (२२,रा.बांद्रा, मुंबई) यांच्यासह अन्य तीन गंभीर जखमी झाले. त्यांना एमजीएम रुग्णालयात हलवले, तर किरकोळ जखमी वंदना साळवे, संतोष सात्काळ, मीना विश्वकर्मा, सागर दरेकर, पल्लवी आरु डे, केशरी वावडे, कविता मांडले, ललिता मांडले, रणजीत साबळे, शकुंतला साबळे, रत्न पवार, शैला पवार, मीरा करकरे, शांताबाई पवार यांच्यासह अन्य २६ जखमींना खोपोली रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. गंभीर जखमींपैकी चालकाची परिस्थिती नाजूक असल्याने, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, तर एका महिलेला पुढील उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आल्याची माहिती यातील जखमी सागर दरेकर यांनी दिली आहे.