वऱ्हाडी मंडळीं अर्ध्या रस्त्यावरुन फिरले माघारी... वाचा ‘ हे ’ आहे कारण..
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 09:20 PM2019-04-18T21:20:27+5:302019-04-18T21:20:47+5:30
रमेश (नाव बदलले आहे) याने पोलीस आहोत असे सांगून सुरुवातीला सोयरीक जमवली. मात्र लग्नाच्या एक दिवस अगोदरच त्याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने अटक केली...
पुणे : आपण पोलिस असल्याचे सांगून सोयरीक जमवली. बोलणी होऊन लग्नाची तारीख देखील ठरली. लग्नाला अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना त्याला दुर्बुध्दी झाली. एका लाचखोरीच्या प्रकरणात त्याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने लग्न ठरले आहे म्हणून जामीन मंजूर केला. मात्र तोपर्यंत खुप उशीर झालेला होता. मुलीकडच्यांनी त्या मुलाची सोयरीक नाकारली होती. गुरुवारी ४ वाजता जामीन मिळाल्यानंतर साडेचारच्या दरम्यान व-हाड लग्नाच्या ठिकाणी जायला निघाले. मात्र मध्येच त्यांना लग्न मोडल्याचे समजले. त्यामुळे अर्ध्या रस्त्यात पोहचलेले वऱ्हाडी मंडळी निराश होऊन माघारी फिरले.
रमेश (नाव बदलले आहे) याने पोलीस आहोत असे सांगून सुरुवातीला सोयरीक जमवली. मात्र लग्नाच्या एक दिवस अगोदरच त्याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने अटक केली. ही गोष्ट मुलीच्या घरच्यांना समजल्यानंतर लग्नाला येणाऱ्या वऱ्हाड मंडळींना त्यांनी लग्न मोडल्याचे कळवले. रमेशसह अजित याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने १ लाख ६ रुपयांची लाच घेताना बुधवारी अटक केली.
तक्रारदाराविरुद्ध गुन्हे शाखेने मोहननगर येथे तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण मिटविण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पैसे द्यायचे असल्याचा बनाव करून व आपण पोलिस असल्याचे सांगत त्यांनी तक्रारदारांकडे लाचेची मागणी केली होती. रमेशचे सातारा जिल्ह्यातील एका मुलीशी लग्न ठरले होते. गुरुवारी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी सातारा येथे त्यांचा विवाह होता. त्यामुळे जामीन मिळाला नसता तर लग्न पुढे ढकलावे लागले असते. मात्र त्यांचे वकील ड. प्रताप परदेशी यांनी रमेशचे लग्न असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे जामीन देण्याची मागणी मान्य करीत विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी त्याला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडले.