वारी निर्बंधमुक्त, मास्क सक्तीचा निर्णय नाही - राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 07:07 AM2022-06-07T07:07:04+5:302022-06-07T07:07:25+5:30

Rajesh Tope : हा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढला असून पॉझिटिव्हिटी रेट चिंताजनक असल्याचेही मंत्री टोपे यांनी सांगितले. दरम्यान, अद्याप मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

Wari restriction free, mask is not a compulsory decision- Rajesh Tope | वारी निर्बंधमुक्त, मास्क सक्तीचा निर्णय नाही - राजेश टोपे

वारी निर्बंधमुक्त, मास्क सक्तीचा निर्णय नाही - राजेश टोपे

Next

मुंबई : कोरोनाचे संकट असले तरी आवश्यक खबरदारी घेऊन यंदा वारी होईल, यात कोणतीच अडचण येणार नाही. योग्य ती काळजी घेऊन दिंडी पूर्ण करावी असा तत्त्वत: निर्णय झाल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली. सहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढला असून पॉझिटिव्हिटी रेट चिंताजनक असल्याचेही मंत्री टोपे यांनी सांगितले. दरम्यान, अद्याप मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर चर्चा झाली. यावेळी आरोग्य विभागाकडून कोविड संदर्भातील सादरीकरणही झाले. या बैठकीनंतर आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, रायगड, पालघर या सहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढला आहे.

काही ठिकाणचा पॉझिटिव्हिटी रेट ५ ते ८ टक्क्यांपर्यंत गेला आहे. ही आकडेवारी काळजी वाढवणारी आहे. या सर्व जिल्ह्यांमधील चाचण्यांची संख्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही जिल्ह्यांमध्ये दर १०० चाचण्यांमागे ६ ते ८ टक्के पॉझिटिव्ह येत असले तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण चार टक्के आहे. यामध्ये गंभीर रुग्णांची संख्या नाही. त्यामुळे काळजीचे कारण नाही. पण या सहा जिल्ह्यांत कोरोना चाचण्या कठोरपणे वाढवण्याच्या सूचना केंद्र सरकारनेही दिल्या असे मंत्री टोपे यांनी सांगितले. 

राज्यात मास्कसक्तीचा निर्णय झालेला नाही. पण लोकांनी स्वत:हून मास्क घालावे. लोकांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी मास्क घालावा. मास्क घातला नाही म्हणून कारवाई होणार नाही. दंड आकारला जाणार नाही. तसेच लसीचे दोन डोस घेतलेल्यांनी बूस्टर डोस घ्यावेत. दुसऱ्या डोसनंतर नऊ महिने झाले असतील तर बूस्टर डोस घ्यायला हवा, असे टोपे म्हणाले. 

आषाढी वारीची तयारी पुढे गेली
पुढील महिन्यातील आषाढी वारीबाबत टोपे म्हणाले की, आता वारीची तयारी पुढे गेली आहे. यंदाची वारी होईल त्यात अडचण येणार नाही. वारीत लाखो वारकरी एकत्र येतात, त्यामुळे काळजी घेऊन वारी पूर्ण करावी लागेल, अशी चर्चा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली.

     कोरोनाचा नवा व्हेरिएंट अधिक संक्रामक असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे. 
     चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी झालेल्या अनेक सेलिब्रिटींना लागण झाली आहे. या मंडळींना बीए ४ व बीए ५ या व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे. तर, राजकीय क्षेत्रातील नेतेही कोरोना पाॅझिटिव्ह होत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. 
     सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही ताप येत आहे. त्यांच्या चाचणीचा अहवाल अद्याप आला नसल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Wari restriction free, mask is not a compulsory decision- Rajesh Tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.