शेतकरी कुटुंबीयांच्या मदतीला वारकरी!
By admin | Published: June 12, 2016 01:56 AM2016-06-12T01:56:29+5:302016-06-12T01:56:29+5:30
चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात आता शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. या कुटुंबांच्या मदतीला मंठा तालुक्यातील एक वारकरी धावून आला आहे. या कुटुंबीयांना
- राजेश भिसे, जालना
चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात आता शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. या कुटुंबांच्या मदतीला मंठा तालुक्यातील एक वारकरी धावून आला आहे. या कुटुंबीयांना मोफत बियाणे, नांगरणी आणि पेरणी करून देण्याची तयारी या वारकऱ्याने केली आहे. त्र्यंबकराव बोराडे असे या वारकऱ्याचे नाव.
त्र्यंबकबापू यांचा जन्म मंठा तालुक्यातील बोराडे पाटोद्याचा. दोन वर्षांपूर्वी त्र्यंबकबापू यांनी पत्नीसह चारधाम केले होते. त्यानंतर, मावंदे (तीर्थस्थळी जाऊन आल्यानंतर करावयाचा धार्मिक विधी) करण्याचे त्यांनी ठरविले. या कार्यक्रमासाठी २ लाख रुपयांचा खर्च त्यांना सांगण्यात आला. आधीच दुष्काळ त्यात इतका पैसा खर्च करणे योग्य नसल्याचे त्यांचे मत बनले. त्यांनी हा कार्यक्रम रद्द करून या पैशांतून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे ठरविले.
त्यानुसार, आईच्या नावाने त्यांनी सरस्वती प्रतिष्ठान स्थापन केले. गतवर्षी मंठा आणि सेलू तालुक्यातील ५ एकरपर्यंत शेती असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुुटुंबीयांची ३०९ एकर शेती नांगरणी आणि पेरणी करून दिली, तसेच मोफत खत आणि बियाणेही दिले. यंदाही मंठा तालुक्यातील ११ आणि सेलू तालुक्यातील १४ अशी २५ शेतकऱ्यांची जवळपास १२६ एकर शेतजमीन यंदा त्र्यंबकबापू नांगरून देणार आहेत, तर आतापर्यंत मोफत खत व बियाणे घरपोच करण्यात आले आहे. त्र्यंबकबापू यांच्याकडे १ ट्रॅक्टर व इतर शेतीऔजारे असून, याच्या आधारे ते इतर शेतकऱ्यांची जमीन नांगरून देतात.
निर्व्यसनी आणि मांसाहार न करणाऱ्या शेतकऱ्यांची मदत करण्याचा निर्धार दोन वर्षांपूर्वी केला होता. त्यानुसार, गतवर्षी व यंदा तहसीलदारांकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची यादी घेतली आहे. या यादीनुसार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदत करण्याचा प्रयत्न आहे.
- त्र्यंबकबापू बारोडे,
प्रगतशील शेतकरी, सेलू