वारकऱ्यांना चंद्रभागेचे वाळवंटच हवे
By admin | Published: July 18, 2015 12:49 AM2015-07-18T00:49:29+5:302015-07-18T00:49:29+5:30
पंढरपूर येथे चंद्रभागेच्या वाळवंटात वारकऱ्यांची व्यवस्था होण्यासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश
- बाळासाहेब बोचरे, लोणंद
पंढरपूर येथे चंद्रभागेच्या वाळवंटात वारकऱ्यांची व्यवस्था होण्यासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी शासनाने निर्णय न घेतल्यास कोणत्याही क्षणी आंदोलन करण्याचा इशारा शुक्रवारी त्यांनी दिला.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळावर लोणंद येथे दिंडी समाजाची बैठक मालक राजाभाऊ आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. न्यायालयाच्या आदेशानुसार चंद्रभागा नदीच्या वाळवंटात वारकऱ्यांच्या व्यवस्थेला बंदी घालण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या समस्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया शुक्रवारी झालेल्या वारकऱ्यांच्या बैठकीत उमटल्या.
वाळवंट हा वारकऱ्यांचा हक्क असून, साधुसंतांच्या मार्गाने जाणारे वारकरी ऐनवेळी कोर्टाच्या मार्गाने कसे जातील, असा मुद्दा या वेळी उपस्थित करण्यात आला. न्यायालयाने निर्णय दिला असला तरी शासनाने न्यायालयात वारकऱ्यांच्या वतीने बाजू मांडावी व वर्षातले किमान १७ दिवस वाळवंट आमच्यासाठी कसे उपलब्ध होईल हे पाहावे, असा मुद्दा माउली जळगावकर यांनी मांडला.
पालखी २१ जुलैला सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. तत्पूर्वी सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा मानाच्या सातही पालख्या अचानक आंदोलन करतील, असा इशारा या वेळी देण्यात आला.
तरडगावला आज उभे रिंगण!
लोणंद येथील अडीच दिवसांचा मुक्काम आटोपून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा शनिवारी दुपारी दीडला तरडगाव मुक्कामासाठी खंडाळा तालुक्यातून मार्गस्थ होणार आहे. वारीतील पहिले उभे रिंगण दुपारी ४ वाजता चांदोबाचा लिंब येथे होईल. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात गुरुवारी आगमन झाले. त्यानंतर अडीच दिवसांसाठी लोणंदमध्ये वैष्णवांचा मेळा स्थिरावला आहे. पालखीचा जिल्ह्यातील तिसरा मुक्काम फलटण तालुक्यातील तरडगाव येथे शनिवारी आहे.
माळशिरसला दिलासा
पालखी तळावर जाण्यासाठी उशीर होतो, असे कारण पुढे करून वाल्हे आणि माळशिरस येथे पालखी गावातून न जाता थेट पालखी तळावर नेण्याचा निर्णय चैत्री बैठकीत घेण्यात आला होता. परंतु तरीही वाल्हे गावातून पालखी नेल्याने दिंडीकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, या वर्षी आता माळशिरस गावातून पालखी नेण्याचा निर्णय घेण्यात आला.
घराला कुलूप लावूनच आलो
वारीचे आकर्षण होते, पण जाता येत नव्हते. आता मुले कमावती झाली, बाहेरगावी गेली. पेरणी झाली, आता करायचे काय? घराला कुलूप लावले आणि वारीला आलो. यंदा आमच्या दृष्टीने पहिली वारी हा मोठा योग आहे, असे कर्नाटकातील कोरेकल (ता. औराद, जि. बीदर) येथील बालाजी व लक्ष्मीबाई बिराजदार या दाम्पत्याने सांगितले. इथे घराची अथवा मुलांची काळजी वाटत नाही. दिवस कसे आनंदात जातात हेच कळत नाही, असेही ते म्हणाले.
नित्याची पूजा व्हावी : पंढरपुरात पांडुरंगाच्या तीन पूजा होतात. खाजगीवाले, नित्याची पूजा आणि शासकीय पूजा अशा तीन पूजा या परंपरेच्या पूजा असून, त्या झाल्याच पाहिजेत. त्यात बदल करू नये, असा मुद्दा जळगावकर यांनी मांडला. वाटचाल करताना ध्वनिक्षेपकावरून दिल्या जाणाऱ्या जाहिराती संदेश दुकानदारांच्या उद्घोषणा या वारकऱ्यांना त्रासदायक असून, पोलिसांनी असे ध्वनिक्षेपक बंद करावेत. पंढरपुरात मुक्कामी दिंड्यांची वाहने जाण्यासाठी काही प्रमाणात सवलत देण्यात येणार आहे. तथापि सामान उतरून घेताच वाहने शहराबाहेर काढण्यात यावीत. दिंडीबाबत निर्णय घेताना सहा जणांच्या कमिटीला तातडीचे अधिकार आहेत.