विदर्भाला उष्ण लाटेचा इशारा
By admin | Published: May 14, 2016 02:36 AM2016-05-14T02:36:02+5:302016-05-14T02:36:02+5:30
गेल्या २४ तासांत संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली असतानाच हवामान खात्याने विदर्भाला पुढील ७२ तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
मुंबई : गेल्या २४ तासांत संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली असतानाच हवामान खात्याने विदर्भाला पुढील ७२ तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. दुसरीकडे मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशावर स्थिर असूनही आर्द्रतेत चढ-उतार नोंदविण्यात येत आहे.
देशाच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या तप्त वाऱ्यामुळे राज्यातील शहरांचे कमाल तापमान सरासरी ३८ अंशाच्या आसपास नोंदवण्यात येत आहे. मुंबईत दिवसेंदिवस उकाड्यात वाढ होत असून, अरबी समुद्रावरून सकाळी मुंबईकडे वाहणारे वारे स्थिर होण्यास दुपार होत आहे. १४ आणि १५ मे रोजी संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. १६ मे रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. १७ मे रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. १४ ते १९ मे या काळात पुण्यासह आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडेल. पुढील ४८ तासांसाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरावरील आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३५, २६ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (प्रतिनिधी)