महाराष्ट्रात गुप्तचर यंत्रणेकडून सावधानतेचा इशारा
By Admin | Published: March 6, 2016 03:36 AM2016-03-06T03:36:12+5:302016-03-06T03:36:12+5:30
गुजरातमध्ये घातपाती कृत्य घडविण्यासाठी लष्कर- ए- तोयबाचे व जैश -ए- महंमद या अतिरेकी संघटनेचे दहा दहशतवादी घातपात घडविण्यासाठी दाखल झाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिलेली आहे
जमीर काझी, मुंबई
गुजरातमध्ये घातपाती कृत्य घडविण्यासाठी लष्कर- ए- तोयबाचे व जैश -ए- महंमद या अतिरेकी संघटनेचे दहा दहशतवादी घातपात घडविण्यासाठी दाखल झाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्वाच्या व्यक्ती व ठिकाणाची बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टिने सर्व आवश्यक खबरदारी घेण्याचे आदेश पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित यांनी सर्व घटकप्रमुखांना दिलेले आहेत.
राज्यात मंगळवारपासून विधिमंडळाचे अधिवेशनाला सुरवात होत आहे, त्यापार्श्वभूमीवर घातपात करण्याचा दहशतवाद्यांचा डाव असू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस मुख्यालयातून तातडीने दूरध्वनीवरुन सर्व पोलीस घटकांमध्ये हा संदेश देण्यात आला. त्यानंतर बिनतारी संदेश यंत्रणेवरुन त्याबाबतची माहिती प्रसारित करण्यात आला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मुख्यालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून माहिती मिळाली, त्यामध्ये गुजरातमध्ये लष्कर- ए- तोयबाचे व जैश -ए- महंमद या अतिरेकी संघटनेचे दहा अतिरेकी शिरलेले आहेत. त्यांच्याकडून घातपात होण्याची शक्यता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालकांनी मुंबईसह सर्व पोलीस आयुक्त व अधीक्षकांना तातडीने संदेश पाठविला, त्यामध्ये म्हटले आहे की, आपल्या हद्दीत राहाणाऱ्या खासदार, सरकारी इमारती यांचे संरक्षण करावे, त्याचप्रमाणे प्रत्येक प्रभारी अधिकाऱ्यांनी आपापल्या हद्दीतील समाजकंटक, गुन्हेगारांच्या रहाण्याची ठिकाणे वेळोवेळी तपासावेत, हद्दीत सर्तकपणे सशस्त्र नाकाबंदी प्रभावीपणे राबवावी, व पोलीस मित्रांची मदत घेवून गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत.