...तर मला वेगळा विचार करावाच लागेल, खडसेंचा भाजपा नेतृत्वाला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 07:22 PM2019-12-07T19:22:28+5:302019-12-07T19:22:50+5:30
राज्यातून सत्ता गेल्यानंतर भाजपाअंतर्गत धुसफूस समोर येऊ लागली आहे.
मुंबई- राज्यातून सत्ता गेल्यानंतर भाजपाअंतर्गत धुसफूस समोर येऊ लागली आहे. एकनाथ खडसे यांनी ओबीसी नेत्यांवर अन्याय होत असल्याचं सांगितल्यानंतर गिरीश महाजनांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं. भाजपामध्ये कोणालाही डावललं जात नाही, मी स्वत: OBC, भाजपामध्ये सर्वाधिक आमदार ओबीसीच आहेत, असं महाजन म्हणाले होते, गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंमधला हा कलगीतुरा आणखीच वाढताना दिसतो आहे. खडसेंनी आता प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना भाजपाला निर्णायक इशारा दिला आहे. भाजपची उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक शनिवारी जळगावात एका खासगी रिसॉर्टवर झाली. त्यावेळी खडसे हे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, उत्तर महाराष्ट्राची बैठक असूनही आपणास यासाठी ३.३० वाजता या, असे सांगण्यात आले. याशिवाय पक्षाच्या कोअर कमिटीतूनही आपणास काढून टाकण्यात आले आहे. मला आता निर्णय प्रक्रियेतून काढून टाकण्यात आलेलं आहे. जाणीवपूर्वक मला दूर करण्यात येत असेल तर मी काय भूमिका घेतली पाहिजे. काही लोकांकडून सातत्यानं अपमान होतोय. अन्याय, अत्याचार होत राहिल्यास मला वेगळा विचार करावा लागेल, अशा इशाराच खडसेंनी भाजपाला दिला आहे.
पुढे ते म्हणाले, बहुजन समाज आणि ओबीसी नेत्यांवर अन्याय होतो आहे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. कार्यकर्ते आजही आम्हाला अन्याय होत असल्याचं सांगत असतात. ओबीसींवर अन्याय होतो की नाही याकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधलेलं आहे. राज्यातल्या लोकप्रतिनिधी, माजी आमदार यांची जी भावना आहे. ती पक्षाच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे. आम्हाला जातीवर बोलायाचं नाही, पण जे घडलं आहे ते तर समोर आलंच पाहिजे. हे जर कोणी करत असेल, तर त्याला प्रतिबंध बसला पाहिजे.
भाजपाचा चेहरामोहरा बदलवण्याचं काम मी मधल्या कालखंडात केलं. मुंडे, महाजन, गडकरी, फरांदे आणि अण्णा डांगे असतील. या सगळ्याच नेत्यांनी पक्ष वाढवला आहे. ज्या पक्षांचे दोन खासदार होते, विधानसभेत फक्त 14 आमदार होते. त्या पक्षाला सत्तेवर बसवण्यामध्ये ओबीसी नेत्यांनी केलेली मेहनत विसरता येणार नाही. ओबीसी आणि बहुजन नेत्यांनी जिवाचं रान केल्यानंच पक्ष मोठा झाला. पक्ष मोठा झाला म्हणून नेतृत्व मिळालं आणि पक्षविस्ताराला वाव मिळाला. पक्षविरोधी काम केलेल्यांवर कारवाई केलीच पाहिजे. चंद्रकांत पाटलांकडे मी सर्व कागदोपत्री पुरावे दिलेले आहेत. ते आता योग्य ती कारवाई करतील, असंही खडसे म्हणाले आहेत.