विदर्भात गारपीटीचा इशारा; मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 07:56 PM2020-03-27T19:56:49+5:302020-03-27T20:05:24+5:30
राज्यात शुक्रवारी दिवसभरात अनेक भागात पावसाने हजेरी लावली.
पुणे : विदर्भात बहुतांश ठिकाणी गुरुवारी पाऊस झाला असून मध्य महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या २४ तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना,विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वार्यासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागने दिला आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
राज्यात सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर येथे ३९.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १८.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
कोकण, गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. पावसामुळे विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात रात्रीच्या तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचवेळी गेले दोन दिवस पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे.राज्यात शुक्रवारी दिवसभरात अनेक भागात पावसाने हजेरी लावली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत महाबळेश्वर, मालेगाव, सातारा, पुणे, लोहगाव येथे किरकोळ पाऊस झाला.
इशारा:
२८ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वार्यासह पावसाची शक्यता आहे.
२९ मार्च रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी
गारांचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
३० मार्च रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
.........
पुण्यात हलक्या पावसाची शक्यता
पुणे शहरात पुढील चार दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे़ शुक्रवारी दुपारी अचानक शहराच्या काही भागात पावसाच्या जोरदार सरी आल्या. लोहगाव येथे सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ३ मिमी तर, शिवाजीनगर येथे ०.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. शहरात होत असलेल्या पावसाने व ढगाळ हवामानाने दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाली असली तरी रात्र मात्र गरम होत चालली आहे. शुक्रवारी सकाळी शहरातील किमान तापमान २१.९ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे. ते सरासरीच्या तुलनेत ४.१ अंश सेल्सिअसने अधिक होते.
पुढील चार दिवस रात्रीचे तापमान १९ व २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.