कोकण, मुंबई, गोव्यात जोरदार पावसाचा इशारा; सातारा, कोल्हापूर, पुण्यातही मुसळधार पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 02:22 PM2020-07-02T14:22:54+5:302020-07-02T14:23:52+5:30
मध्यमहाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
पुणे : कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. येत्या २४ तासात मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये जोरदार तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे. पालघर, रायगड,सिंधुदुग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचे अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. २ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३ व ४ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्यमहाराष्ट्रात जोरदार तर, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोकणात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात ३ जुलै तर, रायगड जिल्ह्यात ४ जुलै रोजी तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई जिल्ह्यात ३ व ४ जुलै रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे.
पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात ३ व ४ जुलै रोजी जोरदार पावसाची शक्यता असून सातारा जिल्ह्यात ४ जुलै रोजी अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.