कोकण,मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 08:37 PM2020-09-05T20:37:15+5:302020-09-05T20:45:59+5:30
पुणे, रायगड, ठाणे, नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला.
पुणे : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असून येत्या २४ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शनिवारी सायंकाळी पुणे, रायगड, ठाणे, नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला.
गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात धुळे, पारोळा, अमळनेर, भुसावळ, दहीगाव, एरंडोल, इगतपुरी येथे मुसळधार पाऊस पडला. कोकण, विदर्भात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून उकाडा वाढला होता. त्यामुळे स्थानिक परिस्थितीमुळे राज्यात अनेक ठिकाणी शनिवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या नाशिक जिल्ह्यात सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत नाशिक येथे ११, मालेगाव येथे ५ आणि बुलढाणा येथे ११ मिमी पावसाची नोंद झाली होती.
रविवारी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ७ सप्टेंबरला कोकण, गोवा व विदर्भात तसेच ८ व ९ सप्टेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.