कोकण,गोव्यासह मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस धुवाधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 08:53 PM2020-08-13T20:53:49+5:302020-08-13T21:14:44+5:30
पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील घाट विभागात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता
पुणे : कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. घाटमाथ्यावरील काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. पुढील चार दिवस कोकणात जोरदार पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रातील घाट विभागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात सर्वदूर पाऊस होण्याच्या दृष्टीने सध्या अनुकूल परिस्थिती आहे.
कोकणात सर्वदूर जोरदार पाऊस झाला आहे. भिरा २००, माथेरान १६०, कल्याण १३०, जव्हार, तलासरी १२०, कर्जत, माणगाव, विक्रमगड ११०, सुधागड पाली, ठाणे, उल्हासनगर १००, अंबरनाथ, भिवंडी, चिपळूण, डहाणु, वाडा ९०, पोलादपूर ८०, दोडामार्ग, मंडणगड, म्हसाळा, मुरबाड, रोहा, शहापूर येथे ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
घाटमाथ्यावरील ताम्हिणी, शिरगाव, अम्बोणे २१०, दावडी, डोंगरवाडी १९०, लोणावळा १४०, खंद, वाणगाव, वळवण १२०, खोपोली ११०, भिवपुरी, ठाकूरवाडी ९०, कोयना, शिरोटा ८० मिमी पाऊस झाला होता. मध्य महाराष्ट्रात इगतपुरी १५०, नवापूर १४०, महाबळेश्वर १३०, ओझरखेडा, राधानगरी, वेल्हे ९०, पेठ ८०, त्र्यंबकेश्वर ७०, हर्सुल, सुरगाणा ६०, पौड मुळशी ५० मिमी पाऊस पडला. याशिवाय सर्वत्र हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. मराठवाड्यात मात्र तुरळक ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस झाला. विदर्भात कुरखेडा ८०, पौनी ६०, आमगाव, भिवापूर, कोरची, लाखंदूर, नागभीड, उमरेड येथे ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गुरुवारी राज्यात दिवसभरात महाबळेश्वर येथे ७८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सातारा ४१, नागपूर १५, गोंदिया १६, पुणे १०, नाशिक १५, सोलापूर व डहाणु येथे ७ मिमी पावसाची नोंद झाली असून विदर्भात सर्व प्रमुख शहरात हलका पाऊस सुरु आहे.
कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस जोरदारचा पाऊस राहणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील घाट विभागात पुढील चार दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच औरंगाबाद, जालना जिल्ह्यात १६ ऑगस्ट तर, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात १५ व १६ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.