राज्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, कोकणाला ऑरेंज अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 05:41 AM2020-09-13T05:41:07+5:302020-09-13T06:38:46+5:30
हवामानात झालेल्या बदलामुळे पुढील आठवडाभर राज्यात मान्सूनचा मारा कायम राहील, असा अंदाज आहे.
मुंबई : बंगालचा उपसागर, आंध्र प्रदेश, ओडिशालगतच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासह अरबी समुद्रातील हवामान बदलामुळे पुढील चार दिवस राज्यात वादळी वाºयासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला.
१३ सप्टेंबर रोजी संपूर्ण कोकणाला आॅरेंज अलर्ट दिला आहे. तर विदर्भासह मध्य महाराष्ट्रातदेखील जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल, अशीही शक्यता वर्तवली आहे. याच काळात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ताशी ५५ किमी वेगाने वारे वाहतील. परिणामी, मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. हवामानात झालेल्या बदलामुळे पुढील आठवडाभर राज्यात मान्सूनचा मारा कायम राहील, असा अंदाज आहे.
कमी दाबाच्या क्षेत्रासह हवामानात होणाºया बदलांमुळे परतीच्या मान्सूनचा प्रवास यंदा उशिराने सुरू होईल. दरवर्षी १५ सप्टेंबरच्या आसपास मान्सून राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू करतो. मात्र यंदा त्यास १५ दिवसांच्या विलंबाची शक्यता आहे. शनिवारी दुपारसह सायंकाळी व रात्री मुसळधार पावसाने मुंबईकरांना अक्षरश: झोडपून काढले. २४ तासांत कोकण, गोव्यात जोरदार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली.
असा आहे हवामानाचा अंदाज
१३ सप्टेंबर : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पाऊस. महाराष्ट्राच्या किनारी भागात सोसाट्याचा वारा. विदर्भासह लगतच्या प्रदेशात चांगला पाऊस.
१४ सप्टेंबर संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस.
१५ सप्टेंबर
मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात मुसळधार पाऊस.
१६ सप्टेंबर
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस.