‘त्या’ गावात सकाळी ९ वाजता होते सूर्यदर्शन

By Admin | Published: August 24, 2014 01:09 AM2014-08-24T01:09:42+5:302014-08-24T01:09:42+5:30

मावळत्या सूर्यासाठी ब्रिटन, उगवत्या सूर्यासाठी जपान आणि मध्यरात्री उगवणाऱ्या सूर्यासाठी नॉर्वे प्रसिद्ध आहे. परंतु विदर्भात असे एक गाव आहे जेथे गेल्या एक दशकापासून सकाळी ९ वाजता सूर्योदय होतो.

'That' was at 9 am in the village | ‘त्या’ गावात सकाळी ९ वाजता होते सूर्यदर्शन

‘त्या’ गावात सकाळी ९ वाजता होते सूर्यदर्शन

googlenewsNext

मोहन भोयर - तुमसर
मावळत्या सूर्यासाठी ब्रिटन, उगवत्या सूर्यासाठी जपान आणि मध्यरात्री उगवणाऱ्या सूर्यासाठी नॉर्वे प्रसिद्ध आहे. परंतु विदर्भात असे एक गाव आहे जेथे गेल्या एक दशकापासून सकाळी ९ वाजता सूर्योदय होतो. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील हे छोटेसे गाव आहे बाळापूर. मानवनिर्मित टेकड्यांमुळे या गावात सकाळी ९ वाजता सूर्योदय होतो.
तुमसर तालुका मुख्यालयापासून ३५ कि़मी. अंतरावर बाळापूर (हमेशा) नावाचे लहानसे गाव आहे. सातपुडा पर्वत रांगात वसलेल्या या गावात बाराही महिने सूर्याची किरणे सकाळी ९ वाजतानंतर दिसतात. या गावाजवळच मॅगनीजची खुली खाण आहे. ही खाण ब्रिटिशकालीन असून हा संपूर्ण परिसर नैसर्गिक खनिज संपत्तीने नटलेला आहे.
१०२ वर्षे जुन्या असलेल्या या खाणीवर केंद्र शासनाची मालकी आहे. खाण खुली असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग करण्यात येते. रोज शेकडो टण भुसभुशीत माती आणि दगड बाहेर निघतात.
ही माती आणि दगडाचे ढिगारे गावाच्या पूर्व, उत्तर आणि दक्षिण बाजूला टाकले जात असल्याने महाकाय उंचच उंच टेकड्या तयार झालेल्या आहेत. त्यामुळे तिन्ही ऋतूत सकाळी ९ वाजेपर्यंत सूर्याची किरणे गावात पोहोचतच नाहीत.
ब्लास्टिंग आणि डम्पिंगमुळे गावात नेहमी धूळ असते. ही धूळ नाकातोंडाद्वारे शरीरात जाते. परिणामी नागरिकांना श्वसनाचे विकार जडले आहेत. अनेकांना क्षयरोगाने ग्रासले असून या परिसरातील पाण्यात क्षार असल्यामुळे अनेकांचे दात पिवळे पडले आहेत. त्यांना हाडाचे विकारही जडले आहेत.
खाण क्षेत्र वाढले
या खाणीत सुमारे १ हजार २०० कामगार कार्यरत आहेत. खाणीचे निश्चित क्षेत्र किती हे अधिकाऱ्यांनाच माहीत नाही. मॅगनीज दिसेल तिथे उत्खनन सुरू आहे. त्यामुळे खाणीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. २०० वर्षे पुरेल इतके मॅगनीज भूगर्भात आहे. या परिसरात जस्ट्रोपा नावाची वनस्पती लावण्याचे निर्देश शासनाने मॉईलला दिले आहेत. जस्ट्रोपोमुळे वातावरणातील प्रदूषण कमी होण्यास मदत होते. परंतु, या परिसरात ही वनस्पती कुठेच दिसत नाही.
अपघाताची प्रतीक्षा
गावाला भेट दिली असता मानवनिर्मित माती व दगडांची उंचच उंच दरड गावात प्रवेश करताच दिसून येते. ही दरड अत्यंत धोकादायक आहे. यामुळे संपूर्ण बाळापूर हे गाव गडप होण्याची भीती आहे. मॉईल प्रशासनाने येथे उपाययोजना केली नाही तर माळीणची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गावकऱ्यांचे पुनर्वसन नाही
मॉईल प्रशासनाने कामगारांचे अन्यत्र पुनर्वसन केले नाही. मॉईलच्या प्रदूषणामुळे शेती नापीक झाली आहे. रोजगारासाठी गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी शहराकडे धाव घेतली आहे. खाण मंत्रालयानेही दखल घेतलेली नाही. स्थानिक बेरोजगार तथा शेतकऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी न देता परप्रांतीयांनाच स्थान दिले आहे.

Web Title: 'That' was at 9 am in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.