सेनेचे आमदार तेव्हा झोपले होते का? विखे-पाटील यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:45 PM2018-03-22T23:45:43+5:302018-03-22T23:45:43+5:30
अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ कायदा लागू करण्याचा निर्णय स्थगित करण्यासंदर्भात आम्ही गेल्या सोमवारीच स्थगन प्रस्ताव दिला होता. मात्र तोपर्यंत गप्प असलेल्या शिवसेनेच्या सदस्यांना ‘मातोश्री’वरून आदेश येताच कशी जाग आली, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
मुंबई : अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ कायदा लागू करण्याचा निर्णय स्थगित करण्यासंदर्भात आम्ही गेल्या सोमवारीच स्थगन प्रस्ताव दिला होता. मात्र तोपर्यंत गप्प असलेल्या शिवसेनेच्या सदस्यांना ‘मातोश्री’वरून आदेश येताच कशी जाग आली, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
‘मेस्मा’ स्थगित करण्यासंदर्भात विरोधीपक्षांनी सभागृहात मतदान घेण्याची रणनिती आखली होती. मतदान झाले तर सरकार धोक्यात येईल, या भीतीपोटी अखेर ‘मेस्मा’ स्थगित करण्यात आल्याचा आरोपही विखे यांनी केला.
मंत्रिमंडळात ते गप्प का- तटकरे
अंगणवाडी सेविकांवरील ‘मेस्मा’ लावण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेतला गेला तेव्हा शिवसेनेचे मंत्री काय करत होते, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केला या संदर्भात बोलताना तटकरे म्हणाले, ‘मेस्मा’ वरून शिवसेनेच्या सदस्यांनी गोंधळ घातला म्हणून मंत्री पंकजा मुंडे यांचा विरोध डावलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेस्मा रद्द केला. मात्र हे उशीरा सुचलेले शहाणपण आहे. ‘मेस्मा’ वर तीन दिवसापूर्वी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मेस्मा रद्द करण्यास सरकारने नकार दिला होता. आता तो रद्द करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे, अशी टीकाही केली.