वाशिम - डॉक्टरच्या मानवतावादी विचाराने खुडल्या जाणा-या कळीला आधार
By admin | Published: September 2, 2016 02:17 PM2016-09-02T14:17:18+5:302016-09-02T14:17:18+5:30
महिलेने तिस-यांदा एका कन्येला जन्म दिल्यानंतर त्या कन्येसाठी आधार शोधण्याचे मानवतावादी कार्य यवतमाळ जिल्ह्यातील शोभा सुराणा या स्त्रीरोग आणि प्रसुतीतज्ज्ञांनी केले.
Next
>दादाराव गायकवाड
ऑनलाइन लोकमत
वाशिम , दि. २ - आधीच पोटी दोन मुली आणि घरची परिस्थिती बेताची अशा स्थितीत तिस-यांदा १२ वर्षानंतर गर्भधारणा झाली. दोन अपत्येच सांभाळणे कठीण असल्याने तिसरे अपत्य नको, म्हणून गर्भपात करून घेण्यासाठी गेलेल्या महिलेस धीर देत गर्भ वाढविण्याची सूचना केली आणि त्या महिलेने एका कन्येला जन्म दिल्यानंतर त्या कन्येसाठी आधारही शोधण्याचे मानवतावादी कार्य यवतमाळ जिल्ह्यातील शोभा सुराणा या स्त्रीरोग आणि प्रसुतीतज्ज्ञांनी केले. कारंजा येथील निर्मल आणि मिना बरडिया या दाम्पत्याने त्या कन्येचा स्वीकार करून डॉ. सुराणा यांचा मानवतावादी कार्य तडीस नेण्यास मोठा हातभार लावला.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे डॉ. शोभा सुराणा या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करीत असतानाच डॉक्टर या नात्याने त्यांनी मानवतावादी विचारांची जपणूक नेहमीच केली आहे. एक दिवस त्यांच्याकडे वणी तालुक्यातीलच एक महिला आली. त्या महिलेला दोन मुली होत्या. लहान मुलगी १२ वर्षाची असताना तया महिलेला गर्भधारणा झाली. घरची परिस्थिती फारशी चांगली नाही. केवळ चार एकर कोरडवाहू शेतीमध्ये राबराब राबून पिकलेल्या धान्यातून मिळेल त्या उत्पन्नाच्या आधारे कुटूंबाची गुजरान करायची, असे अशात दोन मुलींचा कसाबसा सांभाळ करतानाच तिसºयांदा गर्भधारणा झाल्यामुळे महिला आणि तिच्या पतीला मोठी चिंता पडली. त्यांनी गर्भपात करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी हे दाम्पत्य डॉ. शोभा सुराणा यांच्याकडे गेले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि गर्भ दोन महिन्याचा असल्याचे सांगितले; परंतु माझा व्यवसाय आणि धर्मही गर्भपात करण्यास परवानगी देत नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले; परंतु तसे त्या दाम्पत्यांना सांगतानाच त्यांनी त्या दोघांनाही गर्भपात न करण्याचा सल्ला दिला. त्या गर्भाची चांगली सोय घेऊन तो वाढविण्याची सूचना केली आणि त्यासाठी त्यांना सहकार्यही केले, एवढेच नव्हे, तर सदर महिला प्रसतू झाल्यानंतर त्या बाळाला आधार कसा द्यायचा हा विचारही डॉ. सुराणा यांनी करून ठेवला होता. सदर महिलेची प्रसुती ६ आॅगस्ट रोजी झाली आणि तिने एका सुंदर कन्येला जन्म दिला. डॉ. सुराणा यांनी लगेचच ही माहिती त्यांच्या एका नातेवाईकामार्फत कारंजा येथील बरडिया दाम्पत्यापर्यंत पोहोचविली आणि कन्येला दत्तक घेण्याची तयारी आहे, की नाही त्याची शहानिशा केली. कारंजा येथील व्यापारी निर्मल बरडिया यांना मुलबाळ नव्हते, त्यामुळे त्यांनी पत्नीशी चर्चा करून त्याला संमती दर्शविली आणि सदर कन्येस मातापित्यांच्या हस्ते रितसर दत्तकविधान करून घरी आणले. सद्यस्थितीत ही कन्या २८ दिवसांची असून, मिना सुराणा या तिची आई या नात्याने उत्तम काळजी घेत आहेत. डॉ. शोभा सुराणा यांच्या मानवतावादी विचारामुळे एका खुडल्या जाणाºया कळीचे जीवन वाचलेच शिवाय तिला आधार म्हणून एक चांगले घरही मिळाले.