वाशिम : मुख्यमंत्र्यांनी साधला गोवर्धनच्या सरपंचांशी संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 10:59 PM2021-06-11T22:59:04+5:302021-06-11T22:59:27+5:30
गोवर्धन या गावात केलेल्या उपाययोजनांची घेतली माहिती.
वाशिम : एप्रिल महिन्यात एकाच वेळी ५०९ कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या रिसोड तालुक्यातील गोवर्धन या गावात केलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी दखल घेतली. ११ जून रोजी गोवर्धनचे सरपंच गजानन वानखेडे यांच्याशी दुरदृश्य प्रणालीद्वारे त्यांनी संवादही साधला.
"सुमारे ३ हजार ९०० लोकसंख्या असलेल्या गोवर्धन गावात दुसऱ्या लाटेतील पहिला रुग्ण ३ एप्रिल रोजी आढळला होता. त्यानंतर हळूहळू रुग्ण संख्या वाढू लागली. जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावाला भेटी देवून कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी उपाययोजना सुरु केल्या. त्यानंतर गाव समितीने गावात घरोघरी जावून सर्व्हे केला. सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करून घेतली. १५ एप्रिल रोजी ५०९ ॲक्टिव्ह रुग्ण होते. यामध्ये ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत त्यांचे गृह विलगीकरण केले व ज्यांना लक्षणे आहेत त्यांना कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल केले," असे याप्रसंगी सरपंच वानखेडे यांनी सांगितले.
दरम्यान, गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी. कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी गाफील न राहता कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे त्यांनी सांगितले.