स्वच्छ भारत अभियानात वाशिम जिल्हा अव्वल!
By admin | Published: April 15, 2017 12:43 AM2017-04-15T00:43:32+5:302017-04-15T00:43:32+5:30
वाशिम- स्वच्छ महाराष्ट्र या अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीत वाशिम जिल्ह्याने पहिल्या पाचमध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
स्वप्नातील भारत : अमरावती महापालिका दुसऱ्या स्थानावर
वाशिम : ग्रामीण तथा शहरी भाग हगणदरीमुक्ती करण्यासाठी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीत वाशिम जिल्ह्याने पहिल्या पाचमध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आहे. तर अमरावती महापालिकेने या अभियानात दुसरे स्थान पटकाविले असून, पुणे महानगरपालिका अव्वल स्थानी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाला केंद्र आणि राज्य शासनाकडून स्वच्छता अभियानाला महत्त्व दिले जात आहे. स्वच्छ भारत अभियानाच्याच धर्तीवर राज्यातील ग्रामीण भागातील खेडे आणि शहरे हगणदरीमुक्तीसाठी राज्य शासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. हगणदरीमुक्तीसाठी ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका स्तरावर शासकीय अनुदानातून शौचालयांची निर्मिती केली जात आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीला प्रोत्साहन देण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची ‘टॉप’ फाइव्ह आणि नकारात्मक कामगिरी करणाऱ्या संस्थांची ‘बॉटम’ फाइव्ह अशी वर्गवारी करण्यात येत आहे. यामध्ये नवीन आणि जुन्या शौचालयाच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये वाशिम जिल्ह्याने १५५ टक्के उद्दिष्टपूर्तीकरीत पहिले स्थान पटकाविले आहे. दुसरे स्थान कोल्हापूर (१०९ टक्के), तर तिसऱ्या स्थानी ठाणे जिल्हा (८५ टक्के) आहे. तर नकारात्मक कामगिरी करणाऱ्यांमध्ये गडचिरोली (२६ टक्के), यवतमाळ, जालना (४३ टक्के), परभणी (४४ टक्के) जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याचवेळी महानगरपालिका क्षेत्रात पुणे महानगरपालिकेने (२७१ टक्के) पहिले स्थान पटकाविले असून, विदर्भातील अमरावती महानगरपालिका (१२७ टक्के) दुसऱ्या तर वसई विरार महापालिका (१०१ टक्के) तिसऱ्या स्थानी आहे.
ग्रामीण भागात कारंजा दुसऱ्या स्थानी!
स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये ग्रामीण क्षेत्रात पन्हाळा (४६७ टक्के) उद्दिष्टपूर्तीच्या माध्यमातून पहिल्या स्थानी आहे. ग्रामीण भागात कारंजा (४१८ टक्के) दुसऱ्या स्थानावर, तर अरधापूर (१६० टक्के) उद्दिष्टपूर्तीच्या माध्यमातून तिसऱ्या स्थानी आहे. ग्रामीण क्षेत्रात कामठी, घाटंजी, लोणार कमालीचे माघारले गेले आहे. कामठी येथे केवळ ९ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. त्याचप्रमाणे घाटंजी ११ आणि लोणार १६ टक्के उद्दिष्टपूर्तीसह पिछाडीवर आहेत.
सुमार कामगिरी करणाऱ्या महापालिका!
या अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये राज्यातील महानगरपालिकांनी अतिशय सुमार कामगिरी केली आहे. यामध्ये ग्रेटर मुंबई (७ टक्के), परभणी (२४ टक्के) तर भिवंडी महानगरपालिकेने (२५ टक्के) उद्दिष्टपूर्ती केली आहे.