वाशिम जिल्हा महाराष्ट्रात अव्वल
By admin | Published: July 21, 2014 10:24 PM2014-07-21T22:24:05+5:302014-07-21T22:24:05+5:30
निर्मल भारत अभियान : अनुदान वाटपासह शौचालय बांधकामातही आघाडी
वाशिम : निर्मल भारत अभियानच्या पायाभूत सर्वेक्षण ऑनलाईन करणार्यांमध्ये वाशिम जिल्हा सध्या महाराष्ट्रात अव्वल आहे. तसेच मागील अनेक वर्षापासून थकीत असलेल्या शौचालय अनुदानाचे वाटप आणि नविन शौचालय बांधकामालाही गती आली आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार निर्मल भारत अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हय़ांमध्ये सन २0१२-१३ मध्ये पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले होते. सुरुवातीला आकड्यात केलेल्या या सर्वेक्षणाची माहिती आता ऑनलाईनद्वारे केंद्र शासनाला सादर करावयी आहे. शौचालय सुविधा असलेल्या व नसलेल्या राज्यातील १ कोटी २५ लाख कुटुंबाचा यामध्ये समावेश असून या सर्व कुटुंबाची सविस्तर माहिती ३१ जुलै २0१४ पर्यंत ऑन लाईन करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार वाशिम जिल्हय़ातील पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत निर्मल भारत अभियान कक्षाच्यावतीने नियोजन करुन शासनाच्या निर्देशानुसार जिल्हय़ातील ग्रामपंचायतीच्या संग्राम कक्षातील डाटा एन्ट्री ऑपरेटर व बीआरसी यांच्या मदतीने या कामाला गती दिली. एकूण २ लाख १७ हजार ८९७ उद्दिष्टापैकी सद्यस्थितीत (दि. १३ जुलै१४ पर्यंत) जिल्हय़ातील ७६ हजार ३११ कुटुंबांची माहिती ऑनलाईन करण्यात आली आहे. निर्मल भारत अभियानमधून मागील वर्षी शौचालय बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांचे प्रलंबित असलेले अनुदान वाटपात तसेच तालुक्यांमध्ये गती आली असुन सध्या जवळपास ७८ टक्के काम झाले आहे. यासाठी तालुकास्तरावरील बीआरसी कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्याचप्रमाणे चालू (सन २0१४-१४) वर्षातील टार्गेटनुसार मागील तीन महिन्यात शौचालय बांधकामाचे ३८ टक्के साध्य केले आहे.